कोल्हापूर 14 जुलै : कोल्हापूर आणि कोल्हापुरातील परंपरा या नेहमीच वेगळ्या असतात. आषाढी एकादशी नंतर कोल्हापुरात सर्वांना वेद लागतात ते त्र्यंबोली यात्रेचे. ‘पी ढबाक’ अर्थात छोटी सनई आणि डफ यांचा ठेका प्रसादाचे वाटे आणि शहरातल्या वेगवेगळ्या भागांतून निघणाऱ्या मिरवणुका असे वातावरण या निमित्तानं कोल्हापुरात असतं. या यात्रेच्या दरम्यान कोल्हापुरात मटणाच्या वाट्यांच्या वेळी बकऱ्याच्या मुंडीचा लिलाव करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तब्बल 1050 रुपयांना ही मुंडकं विकलं गेलं. कसा झाला लिलाव ? कोल्हापूरच्या शिवाजी पेठेत मरगाई गल्ली मंडळाच्या दारात वाट्यांनंतर वेळी हा लिलाव पार पडला. यावेळी परिसरातील नागरिकांनी या बकऱ्याच्या मुंडीसाठी बोली लावली. बोली लागायला सुरुवात झाल्यानंतर 700, 900, 950, 1000, 1010 असे दर वाढत गेले. शेवटी 1050 रुपयांना ही बकऱ्याची मुंडी एका कोल्हापूरकरानं खरेदी केली.
काय आहे वाट्यांची परंपरा ? आषाढ्यातील त्र्यंबोली यात्रेवेळी वाट्यांची परंपरा ही दरवर्षी पाहायला मिळते. वेगवेगळ्या भागात परिसरातील सर्व नागरिक एकत्रित येऊन ही यात्रा साजरी करतात. यावेळी सर्वांकडून वर्गणी जमा केली जाते. यातून देवीला बळी देण्यासाठी बकरे खरेदी करून त्याचा यात्रे दिवशी बळी दिला जातो. त्यांच्या मटणाचे वाटे करुन ते वाटले जातात. दुपारी नदीचे नवीन पाणी, देवीचा नैवेद्य घेऊन नागरिक कोल्हापुरातल्या टेंबलाईवाडीच्या टेकडीवर गर्दी करत असतात. का दिला जातो बकऱ्याचा बळी ? टेंबलाबाई देवी ही कोल्हापूरची रक्षक देवता आहे. त्यामुळेच त्र्यंबोली यात्रेवेळी देवीने आपले रक्षण करावे, आपल्या सगळ्या पीडांचा नाश करावा आणि बळी स्विकारून तृप्त व्हावे, यासाठी हा बकऱ्याचा बळी दिला जातो. याबाबत एक पौराणिक अख्यायिका देखील सांगितली जाते. मधमाशा का हल्ला करतात? जर असं घडलं तर करायचं काय? VIDEO कामाक्ष दैत्याने महालक्ष्मीसह सर्व देवांना बकऱ्याचे रूप दिले होते. म्हणून त्र्यंबोलीने कामाक्षाला शाप दिला की, एक कल्पपर्यंत तुझं सगळं कुळ बकरे म्हणून जन्माला येईल आणि तुझा बळी आम्ही घेऊ, हा असा उल्लेख करवीर माहात्म्य या ग्रंथात पाहायला मिळतो, अशी माहिती मंदिर आणि मूर्ती अभ्यासक ॲड. प्रसन्न मालेकर यांनी दिली आहे. कोल्हापुरात सध्या बकऱ्याच्या मुंडीचा हा लिलाव चर्चेचा विषय ठरत आहे. तर यावरून कोल्हापूरकर कधी मांसाहारा बद्दलच्या कुठल्या गोष्टीची हयगय करत नाहीत, हे देखील पुन्हा एकदा दिसून आलंय.