मुंबई, 2 जुलै : आषाढाच्या पौर्णिमेला भारतात गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी गुरुची पूजा केली जाते. सोप्या शब्दात सांगायचे तर, अज्ञानातून ज्ञानाकडे जो घेऊन जातो त्याला गुरु म्हणतात. हा सण देशभरात पूर्ण श्रद्धा आणि भावनेने साजरा केला जातो. गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुपूजनाचा दिवस. गुरू हे आपल्या जीवनाचे मार्गदर्शक आहेत, त्यामुळे कुंडलीत गुरु प्रधान असेल तेव्हा कामात यश, कीर्ती आणि शांती प्राप्त होते. गुरुपौर्णिमेचा दिवस हा गुरूंचा आशीर्वाद मिळवून स्वतःची प्रगती करण्याचा आणि गुरू ग्रहाला बळ मिळवण्याचा एक शुभ मुहूर्त मानला जातो. म्हणून साजरी होते गुरुपौर्णिमा आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा ही गुरु पौर्णिमा किंवा आषाढ पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. धार्मिक मान्यतेनुसार वेदांचे निर्माते महर्षी वेद व्यास यांचा जन्म याच दिवशी झाला होता. म्हणून हा दिवस देव व्यासजींची जयंती म्हणूनही साजरा केला जातो. कुंडलीत गुरु दोष असेल तर कामात यश मिळत नाही, जीवनात प्रगतीही होत नाही, असं सांगितलं जातं. यंदा सोमवार, 3 जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे. काही ज्योतिषीय उपायांच्या मदतीने आपण या दिवशी गुरू ग्रह मजबूत करू शकता. गुरु पौर्णिमेला गुरू ग्रह बलवान होण्यासाठीचे उपाय मुंबईतील ज्योतिष विशारद गजानन सांगळे यांनी सांगितले आहेत.
गुरु दोष उपाय - 1. ज्या व्यक्तींचे विवाह जुळत नसतील अश्या मुलगा किंवा मुलगी यांनी गुरू पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये शुभ मुहूर्तावर गुरू यंत्र स्थापित करावे आणि त्याची नियमित पूजा करावी. 2. भाग्योदयासाठी दानाला खूप महत्त्व दिले गेले आहे. गरजू व्यक्तीला गुरू पौर्णिमेच्या दिवशी पिवळे वस्त्र, पिवळ्या रंगाची मिठाई, पिवळ्या रंगाची डाळ, दान केल्यास आपल्याला आर्थिक अडचणीतून सुबत्ता मिळण्यास मदत होते. 3. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या गुरूंना घरी आमंत्रित करा. शुभ मुहूर्तावर त्यांची पूजा करा. अन्नदान करा आणि भेटवस्तू देऊन त्यांचे आशीर्वाद घ्या. असे केल्याने गुरू दोष दूर होईल आणि तुमच्यावर भगवंताची कृपाही होईल कारण भगवंताच्या आधीही गुरुला प्रथम स्थान मिळाले आहे. Guru Purnima 2023 : गुरूपौर्णिमेच्या दिवशी कुणाला आहे समृद्धीचा योग? पाहा प्रत्येक राशीचं भविष्य 4. विद्यार्थ्यांनी गुरू पौर्णिमेच्या दिवशी गिताचे पठण केले पाहिजे. तसेच गौ माताची सेवा केली पाहिजे. जेणे करून विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये याची मदत होईल. 5. गुरु दोषापासून मुक्ती मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे देव गुरू ग्रहाची पूजा करणे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूप्रमाणे गुरू ग्रहाची पूजा करा आणि गुरू चालिसाचा पाठ करा. तुमच्या जीवनात प्रगती होईल, असे ज्योतिष विशारद गजानन सांगळे सांगतात. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)