अक्षय्य तृतियेचे महत्त्व आणि कथा
मुंबई, 21 एप्रिल : वैशाख शुक्ल तृतीया तिथीला अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. यावर्षी अक्षय्य तृतीया 22 एप्रिलला शनिवारी आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दान केल्यानं अक्षय पुण्य प्राप्त होते, जे सदैव आपल्यासोबत राहते, असे मानले जाते. अक्षय्य तृतीयेला दान केल्यानं जीवनात राजयोग निर्माण होऊ शकतो. यातून सामान्य माणूसही श्रीमंत होऊ शकतो. अक्षय्य तृतीयेच्या दानातून मिळालेल्या पुण्यमुळे पुढचा जन्म आनंदी होतो, भाग्य उजळते. अक्षय्य तृतीयेच्या कथेत दानाचे महत्त्व सांगितले आहे. चला अक्षय्य तृतीयेची कथा वाचूया. अक्षय्य तृतीयेची कथा - भविष्य पुराणातील कथेनुसार, धर्मदास नावाचे एक वैश्य शाकालनगर येथे राहत होते. ते धार्मिक व्यक्ती होते. ते नेहमी उपासना आणि दान करत असत. दान-धर्मावर त्यांचा विश्वास होता. त्यांनी नेहमी ब्राह्मणांची सेवा केली आणि देवाच्या भक्तिगीतांमध्ये वेळ घालवला. एके दिवशी त्यांना अक्षय्य तृतीयेची माहिती मिळाली. त्यांना कोणीतरी सांगितले की, अक्षय्य तृतीयेला केलेल्या दानामुळे अक्षय पुण्य मिळते. मग त्यांनी ठरवले की, यावेळी अक्षय्य तृतीयेला पूजा करून दान करायचे.
वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला ते पहाटे उठले. त्यांनी पवित्र नदीत स्नान केलं. मग पितरांचे स्मरण करून त्यांची पूजा केली. त्यांच्यासाठी तर्पण केलं. नंतर आपल्या इष्ट देवतांची पूजा केली. त्यानंतर त्यांनी गरीब ब्राह्मणांना घरी भोजनासाठी बोलावले. त्यांना अन्न दिले, नंतर गहू, हरभरा, सोने, दही, गूळ इत्यादी दान केले. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी धर्मदासांच्या घरी असा पाहुणचार मिळाल्यानं सर्व ब्राह्मणांना खूप आनंद झाला आणि त्यांनी त्याला आशीर्वाद दिला आणि ते आपापल्या घरी गेले. आता दरवर्षी अक्षय्य तृतीयेला ते याच पद्धतीने पूजा आणि दान करायचे. त्यांच्या या कृत्यामुळे घरातील सदस्य नाराज झाले. पत्नी म्हणाली अक्षय्य तृतीयेला असे उपक्रम बंद करा, घरातील लोक त्याच्या विरोधात गेले, पण त्याने अक्षय्य तृतीयेला पूजा आणि दान करणे सोडले नाही. हे वाचा - अक्षय्य तृतीयेची पूजा करताना ‘हे’ काम न विसरता करा; इनकममध्ये झालेली वाढ स्वत: पाहाल
हे अनेक वर्षे चालले. एके दिवशी धर्मदास यांचे निधन झाले. पुढच्या जन्मी त्यांचा जन्म द्वारका नगरीत झाला. तो कुशावतीचा राजा झाला. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी उपासना आणि दानातून मिळालेल्या अक्षय पुण्यमुळे पुढील जन्मात राजयोग तयार झाला आणि तो राजा झाला. या जन्मातही ते धार्मिक होते. त्याला संपत्ती आणि वैभवाची कमतरता नव्हती. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूजेच्या वेळी ही कथा ऐकावी. यामुळे अक्षय पुण्य मिळते, असे मानले जाते.
हे वाचा - अमावस्येची काळीरात्र यांच्यासाठी जणू दिवाळी; जळणाऱ्या चितेवर केले तांत्रिक विधी (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)