मेडद, 14 मार्च: शेत शिवारात शेतकऱ्यांना जाता यावं, शेती अधिक सुलभतेनं करता यावी, बांध आणि रस्त्यांवरून होणारे वाद निकाली निघावेत, यासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे. मे महिन्यात जिल्ह्यातील सुमारे एक हजार पाणंद रस्ते खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी पालकमंत्री शेती, पाणंद रस्ते योजना आखण्यात आली आहे. त्यामुळे याचा फायदा अनेक शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच शेती परिसरातून केली जाणारी शेतमालाची वाहतूक करणंही सुलभ होणार आहे. अशा या शेतकऱ्यांच्या आणि गावकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या मेडद येथील पाणंद रस्त्याचं उद्घाटन करण्यात आलं आहे. पण हे उद्घाटन पारंपरिक पद्धतीनं न करता एका वेगळ्या पद्धतीनं केलं आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी स्वतः जेसीबी चालवला आहे. त्याच्या या व्हिडिओचं गावस्तरावर चांगलचं कौतुक केलं जात आहे.
यावेळी डॉ. देशमुख म्हणाले की,‘‘ज्या शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी शेतात जाण्यासाठी रस्ते नसतात, अशा ठिकाणी शेती करण्यास अडचणी येतात. तर काही ठिकाणी शेतीतून गेल्याने वाद निर्माण होतात. रस्त्याअभावी शेतकऱ्यांना शेती कसता येत नाही, हे देशाचं दुर्दैव आहे. शेतकऱ्यांची ही समस्या सोडविण्यासाठी सर्व प्रांताधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांची नुकतीच एक बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत पाणंद रस्त्यांबाबतच्या अडचणींचा आढावा घेण्यात आला आहे.’’ हे ही वाचा- पुण्यातील द्राक्ष बागायतदार संकटात; उभ्या पिकावर चालवली कुऱ्हाड ‘‘सार्वजनिक बांधकाम विभाग, लोकसहभाग आणि उद्योगांच्या सामाजिक दायित्वातून जिल्ह्यातील सुमारे एक हजार पाणंद रस्ते बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी एका आठवड्यात गावकऱ्यांच्या बैठका घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर गाव नकाशावरून गावाच्या हद्दीत किती पाणंद रस्ते आहेत, याचं मोजमाप केलं जाणार आहे. तसेच अशा रस्त्यांवर किती अतिक्रमणं आहेत, याची माहिती संकलित करून, हे पाणंद रस्ते तयार केले जाणार आहेत,’’ अशी माहितीही जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे.