जुन्नर,26 जुलै: शेतातल्या पिकावर फवारणीच्या कामासाठी गेलेल्या पिता पुत्रांचा तुटलेल्या विजवाहक तारेला स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुणे (Pune) जिल्ह्यातील जुन्नर (Junner) तालुक्यात घडली आहे. ही घटना घडत असताना तिथे असलेल्या कुत्र्याने (pet dog) विजवाहक तार तोंडात धरून ओढल्याचा प्रयत्न केला. पण त्यात हा कुत्राही मृत झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुन्नर तालुक्यातील बोरी खुर्द गावातील पटाडेमळा येथील दोन दिवसापूर्वी झालेल्या वादळात विजेचा सिमेंट पोल शेतात पडला होता. शेतात पडलेल्या विजेच्या तारांमध्ये वीजप्रवाह (electric shock) उतरून यादव भिमाजी पटाडे (वय वर्ष 65 वर्षे) व त्यांचा मुलगा श्रीकांत यादव पटाडे (वय 35) या दोघा पिता पुत्रांचा करुण अंत झाला.
हे दोघे पिता-पुत्र हे शेतातल्या पिकावर औषध फवारणी करत असताना तुटलेल्या विजेच्या तारांना स्पर्श होऊन जागेवर मृत्यू झाला. या पिता-पुत्रांना विजेचा धक्का लागत असताना जवळ असणारा त्यांचा पाळीव कुत्रा त्या ठिकाणी होता. त्यानेही जिवाच्या आकांताने प्रयत्न केला. कुत्र्याने हे पाहिले आणि त्याने या दोघांना वाचविण्यासाठी तोंडात विजेची तार धरून दूर ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र आपल्या मालकाला वाचवण्यात कुत्र्याला अपयश आलेच मात्र स्वत:चा जीव सुद्धा त्याला गमवावा लागला. कुत्र्यालाही मृत्यूला सामोरे जावे लागले.
महावितरणने गावातील विजेची कामे वेळेत न केल्यामुळे हा प्रकार घडल्याचे असून गावातील 27 पोल पडायच्या स्थितीत असताना महावितरण याकडे डोळेझाक करत आहे, अशी संतप्त नागरिकांची स्थानिकांनी दिली. दरम्यान. या घटनेची माहिती मिळताच नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परंतु, महावितरणचे कोणते अधिकारी अथवा कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नव्हते. या वेळी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता थोड्याच वेळात पोहचतो, असे सांगून या प्रकाराकडे टाळाटाळ करत असल्याचे दिसून आले. या दुर्दैवी घटनेमुळे मालकाला वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पाळीव कुत्र्यालाही आपला जीव गमवावा लागल्याने नारिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.