पुणे, 11 डिसेंबर : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून भाजपला टोला लगावला आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्ये भाजपाच्या मताची टक्केवारी कशी वाढली? हे सांगताना त्यांनी पक्षावर गंभीर आरोप केला आहे. निवडणूक गुजरातप्रमाणे हिमाचलमध्ये देखील झाली. मात्र सध्या गुजरात निवडणुकीचीच चर्चा सुरू असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. नेमकं काय म्हणाले अजित पवार? अजित पवार यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवरून भाजपावर गंभीर आरोप केला आहे. मधल्या काळात भाजपचे लोक खोटं बोल पण रेटून बोल असं करत होते. उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांनी मुलायमसिंग यांना कानाखाली मारली असं सोशल मीडियावर पसरवल, अन् दुसऱ्या दिवशी मतदानावर फरक पडला. मात्र वास्तविक पाहाता तसं काहीच नव्हतं असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. शिंदे, फडणवीस सरकारवर निशाणा दरम्यान यावेळी अजित पवार यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर देखील निशाणा साधला आहे. लंपीमुळे हजारो जनावरे मेली त्याकडे लक्ष नाही. राज्यात गोवरची साथ आहे त्याकडे सरकार लक्ष देण्यासाठी तयार नाही. कोरोना काळात मी सकाळी 7 च्या आधी पुण्यातील विधान भवनात हजर होत असे. तेव्हा मी ऑक्सिजन प्लांट उभारण्यापासून ते स्टाफ भरण्यपर्यंत काम केलं, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी यावेळी चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील टीका केली आहे. गेल्या काही काळापासून भाजप नेते महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करत असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.