पुणे 18 जानेवारी : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेनंतर थोड्याशा थांबलेल्या भेटीगाठी पुन्हा सुरु झाल्या की काय असा प्रश्न पडणारं चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळालं. कारण भाजपचे बडे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतली. प्रसाद लाड हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असल्याने या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. महाराष्ट्रात सत्तास्थापनेची चर्चा सुरू असताना अजित पवारांनी बंड करत देवेंद्र फडणवीसांसोबत जात सत्ता स्थापन केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यामुळे अशा भेटी घडल्या की चर्चेला नव्याने सुरुवात होते आणि अंदाजही बांधले जातात. ही चर्चा सुरु असतानाच अजित पवार यांनी खुलासा करत ही भेट सामान्य असल्याचं म्हटलं आहे. काही सार्वजनिक कामानिमित्त लाड हे भेटायला आले होते. यात काहीही वेगळं नाही. अशा भेटी होत असतात असंही अजित पवारांनी सांगितलं. पुण्यातल्या सर्किट हाऊसवर ही भेट झाली.
अजित दादांचा धडाका सुरुच पदभार स्वीकारल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठका आणि निर्णयांचा धडाकाच लावलाय. पुण्यात आज त्यांनी विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत मेट्रोसंदर्भातले अनेक महत्त्वाचे निर्णय अजित पवारांनी घेतले. मेट्रोचे प्रस्तावित 6 कॉरिडॉर टप्प्याटप्प्याने सुरू करण्याऐवजी सगळ्या कॉरिडॉरचं काम एकाचवेळी सुरू करण्यासाठी डीपीआर करण्याचे आदेश त्यांनी दिलेत. त्याचबरोबर पुणे मेट्रोचं नाव बदलून ‘पुणे-पिंपरी चिंचवड महामेट्रो’ असं करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्यात.
पिंपरी स्वारगेट मेट्रो मार्ग वाढवून निगडी कात्रज असा करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आलाय. वनाज रामवाडी मार्ग वाढवून तो चांदणी चौक ते वाघोली असा होणार आहे. शिवाजीनगर हिंजवडी हा पीएमआरडीए करत असलेला मेट्रो चा मार्ग शिवाजीनगर माण असा वाढवण्यात येणार आहे.
हडपसर स्वारगेट हा मार्ग नव्याने प्रस्तावित आहे. तर निगडी चाकण मेट्रो मार्गाची चाचपणी करण्याचे आदेश देण्यात आलेत. खडकवासला ते स्वारगेट हा ही मेट्रो मार्ग प्रस्तावित आहे. वारजे ते शिवाजीनगर ह्या मार्गाचा विचार करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात.