जालना, 12 जून: दारुड्या मुलानं आपल्या जन्मदात्या आईचा खून करून स्वतः मामाला फोन करून याची माहिती दिल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी समोर आली आहे. बदनापूर तालुक्यातील लालवाडी शिवारात ही घटना घडली आहे. आरोपी मुलगा फरार आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस दारुड्या खुनी मुलाचा शोध घेत आहेत. हेही वाचा.. औरंगाबादमधील बहीण-भाऊ दुहेरी हत्याकांड प्रकरणी धक्कादायक माहिती उजेडात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बदनापूर तालुक्यातील लालवाडी (तहत घाटी सिरसगाव) येथील भागचंद दगडू बारवाल (वय- 65) हे गुरुवारी रात्री पुतण्याची वास्तुशांती असल्याने त्यांच्या घरी उशिरापर्यंत होते. वडील घरी नाही, ही संधी साधून दारुडा मुलगा गोपीचंद बारवाल (वय 35) याने आई अन्साबाई बारवाल (वय 60) यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात अन्साबाई यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर माथेफिरू मुलगा गोपीचंद बारवाल याने स्वतः मामाला फोन करून आईचा काटा काढल्याची माहिती दिली. या घटनेनंतर आरोपी पसार झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कोठाळे, सहायक पोलिस निरीक्षक सुदाम भागवत, सहायक पोलीस निरीक्षक भिमाळे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. हेही वाचा.. 4 वर्षाच्या मुलाला विषारी द्रव्य पाजून सलून व्यावसायिकाचा आत्महत्येचा प्रयत्न या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. बदनापूर पोलिस स्टेशनमध्ये आरोपी गोपीचंद भागचंद बारवाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे.