सांगोला, 25 एप्रिल: कोरोनाच्या धास्तीमुळे एका वृद्धाचा मृतदेह गावाच्या वेशीवरच अडवून अंत्यविधीला विरोध करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढंच नाही तर गावकऱ्यांनी मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांवर गावकऱ्यांनी बहिष्कार घातला आहे. गावकऱ्यांनी कडाडून विरोध केल्यामुळे अखेर पीडित कुटुंबीयांना वृद्धाच्या पार्थिवावर गावाबाहेरील शेतात अंत्यसंस्कार करावे लागले. सांगोला तालुक्यात ही घटना घडली आहे. हेही वाचा… ‘आम्हाला भाकरीची किंमत माहिती आहे’, गरीबांच्या पोटासाठी भावांनी विकली जमीन याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिरभावी (ता. सांगोला) येथील एका 70 वर्षीय वृद्धावर आजारपणामुळे पुण्यात ससून रुग्णालयात निधन झालं. श्वसनविकार व न्यूमोनियामुळे वृद्धाचं निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केलं. त्यानंतर मुलगा बबलू कांबळे याने एका महिला नातेवाईकासह भाडोत्री वाहनातून वडिलांचा मृतदेह शिरभावी गावात आणला. कोरोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी, संचारबंदी तथा जिल्हाबंदी असतानाही मृतदेह पुण्याहून कसा आणला, याबद्दल गावकऱ्यांनी आक्षेप घेत गावातील सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यविधीला विरोध केला. एवढंच नाही तर संपूर्ण गावानं केवळ कोरोनाच्या धास्तानं मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांवर गावकऱ्यांनी बहिष्कार घातला. त्यामुळे नातेवाईक महिलेच्या मदतीने शेतातच अंत्यसंस्कार करावे लागले. हेही वाचा.. COVID-19 च्या सर्व चाचण्या व उपचार निशुल्क, सरकारनं घेतला मोठा निर्णय अंत्यसंस्कार उरकल्यानंतरही गावकऱ्यांनी मृताच्या मुलाला आणि त्याच्या नातेवाईक महिलेला गावात येण्यास विरोध केला. दरम्यान, ही बाब समजल्यानंतर गावात पोलिस धावून आले. गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. अखेर मृताच्या मुलासह संबंधित नातेवाईक महिलेची सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत. दरम्यान, पुण्यातून मृतदेह सांगोल्यात आणलेल्या दोघांना सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले. दोघांचीही प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगण्यात येत आहे. संपादन- संदीप पारोळेकर