जयपूर प्रिंसेस दिया कुमारी
नवी दिल्ली, 25 जुलै : पूर्वाश्रमीच्या जयपूरच्या राजकन्या आणि राजस्थानमधल्या राजसमंदमधल्या भाजपच्या खासदार दिया कुमारी यांच्या वक्तव्यांमुळे अनेकदा वाद उद्भवतात. प्रेमाचं प्रतीक मानलं जाणारा जगप्रसिद्ध ताजमहाल हा आपल्या पूर्वजांच्या मालकीचा असल्याचं वक्तव्य त्यांनी एकदा केलं होतं. कारण मुघल बादशहा शहाजहानने आपल्या कुटुंबीयांची जमीन बळकावून त्यावर ताजमहाल बांधला असल्याचा दावा त्यांनी केला होता. दिया कुमारी यांच्याविषयी अधिक जाणून घेऊ या. ‘झी न्यूज’ने याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. कौटुंबिक पार्श्वभूमी आणि शिक्षण ब्रिटिशांच्या काळातल्या जयपूर संस्थानाचे शेवटचे सत्ताधीश मानसिंह द्वितीय यांची नात म्हणजे दिया कुमारी. त्यामुळे त्या जयपूर राजघराण्याच्या पूर्वाश्रमीच्या राजकुमारी. 30 जानेवारी 1971 रोजी जयपूरमध्येच त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील भवानीसिंह हे भारतीय लष्करात मोठे, पराक्रमी अधिकारी होते. पद्मिनी देवी हे दिया कुमारी यांच्या आईचं नाव. नवी दिल्लीतलं मॉडर्न स्कूल, मुंबईतलं जी. डी. सोमाणी मेमोरियल स्कूल आणि जयपूरमधलं महाराणी गायत्री देवी गर्ल्स पब्लिक स्कूल या शाळांमध्ये दिया कुमारी यांचं शिक्षण झालं. त्यानंतर त्या लंडनला गेल्या आणि तिथल्या पार्सन्स आर्ट अँड डिझाइन स्कूलमधून त्यांनी फाइन आर्ट्स डेकोरेटिव्ह पेंटिंग या विषयात डिप्लोमाचं शिक्षण घेतलं. 6 ऑगस्ट 1997 रोजी दिया कुमारी यांनी राजघराण्यातल्या नव्हे, तर एका सर्वसामान्य व्यक्तीशी विवाह केला. पेशाने चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या नरेंद्रसिंह राजावत यांच्याशी त्यांचा विवाह झाला; मात्र डिसेंबर 2018मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. या दाम्पत्याला 12 जुलै 1998 रोजी झालेला पहिला मुलगा म्हणजे पद्मनाभसिंह. त्याला त्याच्या आजोबांनी म्हणजे दिया कुमारी यांच्या वडिलांनी म्हणजे आपल्या राजघराण्याचा वारस म्हणून दत्तक घेतलं. 22 नोव्हेंबर 2002 रोजी हा दत्तकविधी झाला आणि 27 एप्रिल 2011 रोजी जयपूरच्या महाराजापदाचा मुकुट पद्मनाभसिंह यांच्या शिरावर चढवला गेला. त्याव्यतिरिक्त दिया कुमारी यांना लक्षराजसिंह हा मुलगा आणि गौरवी कुमारी ही मुलगी आहे. राजकारणात प्रवेश 10 सप्टेंबर 2013 रोजी दोन लाखांहून अधिक जनतेच्या साक्षीने आणि गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, भाजपचे तत्कालीन अध्यक्ष राजनाथसिंह, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्या उपस्थितीत दिया कुमारी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 2013मध्ये राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीत त्या सवाई माधोपूरमधून आमदार म्हणून निवडून आल्या. 2019मध्ये त्या राजसमंद इथून लोकसभेच्या खासदार म्हणून निवडून आल्या. ‘या’ व्यक्तीची विषारी सापांसोबत मैत्री, आतापर्यंत 22 हजारांहून अधिक सापांना पकडलं, VIDEO संपत्ती आणि मालमत्ता जयपूरच्या राजघराण्याची एकूण संपत्ती किती, याचा नेमका अंदाज लावणं तसं कठीण आहे; मात्र फोर्ब्ज आणि अन्य ऑनलाइन स्रोतांच्या आधारे असं सांगता येईल, की दिया कुमारी यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती सुमारे 2.8 अमेरिकन डॉलर्स एवढी आहे. त्यांच्या संपत्तीत वेगवेगळ्या मालमत्ता, उद्योग, ट्रस्ट्स, शाळा आदींचा समावेश आहे. जयपूरच्या सिटी पॅलेसमध्ये त्या राहतात. जयगड किल्ला, अंबर किल्ला, महाराजा सवाई मानसिंह द्वितीय म्युझियम ट्रस्ट, जयगड पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, दी पॅलेस स्कूल, महाराजा सवाई भवानीसिंह स्कूल या दोन शाळा, तसंच जयपूरमधलं राजमहाल पॅलेस, माउंट अबूमधलं हॉटेल जयपूर हाउस आणि जयपूरमधलं हॉटेल लाल महाल पॅलेस ही तीन हॉटेल्स आदींचा त्यांच्या मालमत्तांत समावेश होतो. सामाजिक कार्य करण्यासाठी प्रिन्सेस दिया कुमारी सोशल फाउंडेशनची स्थापना त्यांनी केली आहे. आधी चांदीसारखा दगड आढळला, आता आणखी खजिना आढळणार? वाचा सविस्तर वादग्रस्त दावे दिया कुमारी यांनी असा दावा केला होता, की ज्या जमिनीवर शहाजहानने ताजमहाल बांधला, ती पूर्वीच्या जयपूर राजघराण्याच्या मालकीची जमीन होती. त्या जमिनीवर एक महाल होता. ताजमहाल बांधण्याआधी शहाजहानने तो ताब्यात घेतला, असं दिया कुमारी यांचं म्हणणं आहे. तसंच, भगवान रामाच्या पुत्रापासून जयपूर राजघराण्याचा वंश वाढला आहे, असाही दावा दिया कुमारी यांनी पूर्वी केला होता. ‘आम्ही भगवान रामाचे वंशज आहोत हे सिद्ध करण्यासाठी सुप्रीम कोर्टात पुरावे सादर करण्याची माझी इच्छा आहे, जेणेकरून अयोध्येतल्या राम मंदिराच्या कामाला वेग येईल,’ असं दिया कुमारी म्हणाल्या होत्या.