भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तपास यंत्रणा तिच्यावर बारीक लक्ष ठेवून आहेत.
नवी दिल्ली, 25 जुलै : सीमा हैदर प्रकरणाचा गुंता दिवसागणिक वाढत चालला आहे. ती नोएडात आल्यानंतर लगेचच एसटीएस अधिकाऱ्यांनी तिच्यासह तिचा नवरा सचिन मीणा आणि सासरा नेत्रपाल यांना ताब्यात घेतलं होतं. त्यावेळी सीमाची कसून चौकशी करण्यात आली होती. मात्र नंतर एटीएसने तिघांनाही सोडून दिलं होतं. परंतु असं असलं तरी, सीमा एटीएसच्या नजरेतून काही सुटलेली नाहीये. आता पुन्हा एकदा तिला चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. आज एटीएस आणि आयबी म्हणजे गुप्तचर विभागाने पुन्हा एकदा सीमा आणि सचिनला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. सीमा अवैधरित्या भारतात आल्याने तिची वारंवार चौकशी करण्यात येत आहे. एटीएसकडून सुरुवातीला झालेल्या चौकशीत सीमा गुप्तहेर असण्याबाबत कोणतीही माहिती समोर आली नव्हती. मात्र सीमाने दिलेली काही उत्तरं असमाधानकारक होती. त्यामुळे आता एटीएसला हे जाणून घ्यायचंय की, सीमाने सचिनच्या आधी भारतात कोणा-कोणाशी संपर्क साधला होता किंवा बोलण्याचा प्रयत्न केला होता.
दरम्यान, अलीकडेच समोर आलेल्या माहितीनुसार, सीमाने भारतात येण्यासाठी दोन प्लॅन बनवले होते. त्यातील प्लॅन ‘ए’ यशस्वी झाला आणि ती भारतात आली त्यामुळे तिला प्लॅन ‘बी’चा वापर करावा लागला नाही. शिवाय आता तिने पाकिस्तानात माझ्या जीवाला धोका असून मला भारतीय नागरिकत्त्व द्या, अशी मागणीही भारत सरकारकडे केली आहे. सीमानं रचला होता प्लॅन B, व्हिसामुळे उघड झाली मोठी माहिती सीमा सतत सांगतेय की, ती केवळ सचिनच्या प्रेमाखातर भारतात आली आहे. मात्र हे अनेकांना काही फारसं पटलेलं नाहीये. शिवाय व्यवस्थित प्लॅन करून ती नेपाळहून भारतात आली, म्हणजेच तिच्या मनात आणखी काही शिजत असेल का, ती पाकिस्तानी गुप्तहेर असेल का, असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. त्यामुळेच भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तपास यंत्रणा तिच्यावर बारीक लक्ष ठेवून आहेत.