नवी दिल्ली, 19 जून : काँग्रेस नेते राहुल गांधी आज 53 वर्षांचे झाले. त्यांना अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान भारत जोडो यात्रा राजस्थानमध्ये असताना राहुल गांधींनी ट्रॅव्हल आणि फूड चॅनल Curlytales सोबत मारलेल्या मजेदार गप्पांचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये, राहुल गांधी त्यांचं बालपण, शिक्षण आणि पहिली नोकरी याविषयी भरभरून बोलताना दिसत आहेत. याशिवाय, पंतप्रधान झाल्यास ते काय करतील हेदेखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. Curlytales शी मारलेल्या गप्पांमध्ये राहुल गांधी यांनी आपला लग्नाबाबतचा दृष्टीकोन मांडला आहे. आपण लग्नाच्या विरोधात नसल्याचे राहुल गांधी म्हणाले. ते म्हणाले, “माझ्या आई-वडिलांचं लग्न आणि नातं फार सुंदर होतं. म्हणून माझा अपेक्षांचा बार खूप जास्त आहे. पण, जोडीदार कसा असावा याबाबत माझी चेकलिस्ट जास्त नाही. ती व्यक्ती फक्त प्रेमळ आणि बुद्धिमान असली पाहिजे.” या मुलाखतीमध्ये राहुल यांनी दिल्लीतील आवडत्या रेस्टॉरंट्सची नावं सांगितली आहेत. त्यांना शक्यतो जुन्या दिल्लीतील विविध रेस्टॉरंट्समध्ये जेवणं करणं आवडतं. मोती महल, सागर, स्वागत, सर्वाना भवन ही त्यांची आवडती रेस्टॉरंट्स आहेत. याशिवाय, ते आपला आहार आणि व्यायामाबद्दलही बोलले आहेत. राहुल गांधी म्हणाले की, ते नेहमीच कोणत्या ना कोणत्या फिजिकल अॅक्टिव्हिटी करत असतात. मार्शल आर्टशिवाय त्यांना डायव्हिंगही येतं. भारत जोडो यात्रेतही नियमितपणे मार्शल आर्टचे वर्ग घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. आहारामध्ये जास्तीत जास्त कार्बोहायड्रेट्स टाळण्याचा प्रयत्न राहुल करतात. पण, जर त्यांना भात किंवा चपाती खाण्याची वेळी आली तर ते चपातीला प्राधान्य देतात. मांसाहार प्रेमी असल्यामुळे त्यांना चिकन टिक्का, सीख कबाब आणि साधं ऑम्लेट खायला आवडतं. दररोज सकाळी एक कप कॉफी पिण्याची त्यांना सवय आहे. Nehru Memorial Museum And Library : मोदी सरकारकडून आणखी एका संस्थेचं नामांतर; काँग्रेस आक्रमक, म्हणाले.. झोपताना बेडच्या बाजूला काय असतं? या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधींनी सांगितलं की, त्यांच्या बेडच्या बाजूला एक ड्रॉवर आहे. त्यामध्ये ते पासपोर्ट, काही कागदपत्रं, रुद्राक्ष, पाकिट आणि फोन ठेवतात. आपल्या पहिल्या नोकरीबद्दल बोलताना राहुल गांधी म्हणाले होते की, त्यांनी लंडनमधील मॉनिटर कंपनी नावाच्या एका स्ट्रॅटेजिक कन्सल्टिंग कंपनीमध्ये पहिली नोकरी केली होती. राहुल म्हणाले, “त्यावेळी माझा पहिला पगार खूप जास्त वाटत होता. तेव्हा मी 25 वर्षांचा होतो आणि मला जवळपास तीन हजार पाउंड मिळाले होते. घराचं भाडं भरण्यात आणि वस्तू खरेदी करण्यात मी ते खर्च केले.”
पंतप्रधान झाल्यास काय कराल? असा प्रश्न विचारला असता राहुल म्हणाले की, संधी मिळाल्यास ते शिक्षण व्यवस्थेत बदल घडवून आणतील, मध्यम-उद्योगांना मदत करील, शेतकरी आणि बेरोजगार तरुणांसह जे कठीण आयुष्य जगत आहेत अशा लोकांच्या पाठीशी उभे राहतील.