ज्यांच्या घरी स्वच्छ पाणीपुरवठा होतोय, तेसुद्धा भीतीने पाणी उकळून पिऊ लागले आहेत.
गुलशन सिंह, प्रतिनिधी बक्सर, 8 जुलै : कडाक्याच्या उन्हातून आल्यावर थंडगार पाणी प्यावंसं वाटतं. हे पाणी पिताना कायम आपल्याला ‘जब वी मेट’ चित्रपटातील ‘पानी का काम पानी ही करता है’, हा डायलॉग आठवतो. पाण्याला रंग नसतो, चव नसते, असं म्हटलं जातं परंतु शहर आणि गावाकडील पाण्याच्या चवीत जरा फरक जाणवतो. परंतु सगळीकडचं पाणी पिण्यायोग्य असतं. याबाबत बिहारच्या बक्सर जिल्ह्यातून मात्र एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथील एका घरात चक्क तेलकट पाणी येतंय. या पाण्याचा वासही डिझेलसारखा विचित्र आहे. शिवाय जिथे पाणी सांडेल तिथून कोणतरी घसरून पडेल अशी अवस्था झाली आहे. नळापासून मोटारपंपापर्यंत सगळीकडे सारखंच पाणी आहे. ते पिणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे आता या घरातील सदस्यांना बाहेरून विकत पाणी आणून वापरावं लागतंय. चौसा-बक्सर मुख्य रस्त्यावर राहणाऱ्या शिवानंद राय यांच्या घरातील हा प्रकार आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ज्यांच्या घरी स्वच्छ पाणीपुरवठा होतोय, तेसुद्धा भीतीने पाणी उकळून पिऊ लागले आहेत.
शिवानंद यांच्या घरात 4 जुलैपासून तेलकट पाणी येतंय. त्यांनी याबाबत जिल्हा दंडाधिकारी धीरेंद्र मिश्रा यांना माहिती दिल्यानंतर तपासणीसाठी अधिकारी शिवानंद यांच्या घरी दाखल झाले. त्यांनी हे पाणी बाटल्यांमधून चाचणीसाठी पाठवलं आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पाणी तेलयुक्त आहे हे नक्की, मात्र पाण्यात नक्की पेट्रोल की डिझेलचं मिश्रण झालंय, ते कशामुळे झालं, हे चाचणीच्या अहवालांतून स्पष्ट होईल. कहर! मुलाला केळीच्या पानावर गंगेत सोडलं, कारण वाचून हैराण व्हाल दरम्यान, जोपर्यंत स्वच्छ पाणीपुरवठा होत नाही तोपर्यंत शिवानंद यांच्या कुटुंबियांना पिण्यासाठी, आंघोळीसाठी आणि इतर कामांसाठी पाणी पुरवण्याचं काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतलं आहे. परंतु या प्रकाराने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.