गुजरातमध्ये मालवाहू रेल्वेच्या धडकेने एका सिंहाचा मृत्यू; तर एक सिंह गंभीर जखमी
अहमदाबाद, 22 जुलै : गुजरातच्या अमरेली जिल्ह्याच्या राजुला तालुक्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. शुक्रवारी (21 जुलै) पहाटे एका मालवाहू रेल्वेची दोन सिंहांना धडक बसली. त्यामुळे एका सिंहाचा मृत्यू झाला असून, एक सिंह गंभीर जखमी झाला आहे. सुदैवाने दोन सिंहिणी रेल्वेची धडक बसण्यापूर्वीच रेल्वे रूळ ओलांडण्यात यशस्वी झाल्या. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत. वनाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्ण वाढ न झालेले म्हणजेच सुमारे तीन ते चार वर्षं वयाचे दोन सिंह आणि दोन प्रौढ सिंहिणी रेल्वे रूळ ओलांडत असताना ही दुर्घटना घडली. मालवाहू रेल्वेची धडक बसल्याने एका सिंहाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा सिंह गंभीर जखमी झाला. दोन सिंहिणी मात्र धडक बसण्याआधी रूळ ओलांडण्यात यशस्वी झाल्या. जखमी झालेल्या सिंहावर जवळच्या बचाव केंद्रात तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले. तसंच, नंतर त्याला पुढच्या उपचारांसाठी जुनागढमधल्या सक्करबाग प्राणिसंग्रहालयात हलवण्यात आलं.
जुनागढच्या मुख्य वनसंरक्षक आराधना साहू यांनी सांगितलं, ‘शुक्रवारी पहाटे हा अपघात घडला. दोन सिंहांसह दोन सिंहिणी रेल्वे रूळ ओलांडत असताना दोन सिंहांना रेल्वेची धडक बसली. दुर्दैवाने एका सिंहाचा मृत्यू झाला असून, दुसऱ्याला गंभीर जखमा झाल्या आहेत.’ अशाच प्रकारची दुर्घटना सप्टेंबर 2022 मध्येही घडली होती. त्या वेळी अमरेली जिल्ह्यातला हाच रेल्वेमार्ग ओलांडत असताना सिंहाच्या एका छाव्याला पॅसेंजर ट्रेनची धडक बसली आणि त्याला प्राण गमवावे लागले होते. आता तशाच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. Adhik Maas 2023 : अधिकमासात करा ‘हे’ व्रत भगवान विष्णू होतील प्रसन्न,19 वर्षांनी जुळून आला योगायोग दरम्यान, 2022मध्ये गुजरात सरकारने राज्य विधानसभेत धक्कादायक आकडेवारी सादर केली आहे. डिसेंबर 2021 पर्यंतच्या दोन वर्षांत 283 सिंह, सिंहिणी आणि छाव्यांचा मृत्यू झाला. त्यापैकी 29 सिंहांच्या मृत्यूची कारणं अनैसर्गिक होती. अनैसर्गिक कारणांमध्येच अपघाती मृत्यूंचा समावेश होतो. 2022च्या अंदाजानुसार, गुजरातमधल्या गीर वन्यजीव अभयारण्यात 674 आशियाई सिंहांचं वास्तव्य आहे. आशियाई सिंहांचं वास्तव्य हे गुजरातच्या आणि भारताच्या अभिमानाचं प्रतीक आहे. त्यामुळेच सिंहांचे अशा प्रकारे अनैसर्गिक मृत्यू होणं ही गंभीर बाब आहे.