मच्छीमारांचं नशिब फळफळलं!
हावडा, 12 एप्रिल : पश्चिम बंगालमधल्या हावडा इथल्या शिवगंज इथल्या दामोदर नदीमध्ये सोमवारी (10 एप्रिल) एक भला मोठा मासा सापडला. ब्लॅक कार्प फिश असं त्याचं नाव आहे. आजवर असे अनेक मासे नदीत सापडले आहेत; मात्र या वेळी सापडलेला हा मासा खूप मोठा असल्याने त्याला घाऊक बाजारात तब्बल पाच हजार रुपये किंमत मिळाली आहे. शिवगंजमध्ये राहणाऱ्या मृत्युंजय मोंडल यांच्या जाळ्यात हा मोठा ब्लॅक कार्प फिश अडकला. सोमवारी (10 एप्रिल) सकाळी मृत्युंजय दामोदर नदीत मासेमारी करत होते. त्या वेळी त्यांच्या जाळ्यात मोठा ब्लॅक कार्प मासा अडकला. त्यांनी यापूर्वी काही वेळा मोठे मासे पकडले आहेत; मात्र या वेळी मिळालेला मासा खूपच मोठा होता. त्याबद्दल त्यांनाही आश्चर्य वाटलं. नदीमध्ये असे मोठे मासे क्वचितच आढळतात. याआधी 5-7 किलो वजनाचे ब्लॅक कार्प मासे सापडले आहेत. क्वचित 10-12 किलो वजनाचे मासे सापडण्याच्या घटनाही घडल्या आहेत; मात्र या वेळेस मिळालेला मासा चक्क 19 किलो 600 ग्रॅम वजनाचा होता. या माशाला पाहायला मोठी गर्दी झाली होती. सोमवारी श्यामपूरमधल्या संध्यामयी घाऊक मासे बाजारात हा मासा विक्रीसाठी नेण्यात आला. त्या वेळी विक्रेते आणि ग्राहकांनी तो पाहण्यासाठी गर्दी केली होती. इतका मोठा मासा आजवर न पाहिल्यामुळे सगळेच जण आश्चर्य व्यक्त करत होते. काहींनी मासा खरेदी करण्याची इच्छाही व्यक्त केली; मात्र माशाची किंमत ऐकून सगळ्यांनी माघार घेतली. हा भव्य मासा पाच हजार रुपयांना विकला गेला. अमिरूल नावाच्या एका विक्रेत्याने तो विकत घेतला. वाचा - Latur News : दुर्मीळ पक्षावर कुणाचा डोळा? गावकऱ्यांच्या सतर्कतेनं अनर्थ टळला, Video घाऊक बाजारात माशाची किंमत किलोला 250 रुपये असते; मात्र हा मासा खूप मोठा आणि दुर्मीळ असल्याने त्याला जास्त किंमत मिळाली. तसंच किरकोळ बाजारात हा मासा 300 ते 350 रुपये किलो या दरानं विकला जाऊ शकतो असं विक्रेत्याचं म्हणणं आहे. काही महिन्यांपूर्वी श्यामपूरच्या रूपनारायण नदीत एका मच्छिमाराच्या जाळ्यात 14 किलो वजनाचा ‘भोला मासा’ अडकला होता. तोही बाजारात काही हजार रुपयांना विकला गेला. आता दामोदर नदीमध्ये सापडलेल्या 19 किलो 600 ग्रॅम वजनाच्या ब्लॅक कार्प माशालाही चांगली किंमत मिळाली आहे. इतका मोठा मासा सापडल्याने मृत्युंजय यांच्या कुटुंबीयांना खूप आनंद झाला आहे. मच्छिमारांची उपजीविका मासेविक्रीवरच चालते. त्यामुळे कधी तरी असे मोठे मासे मिळाले, की त्यांना त्याचा चांगला मोबदला मिळतो.