सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक
श्रीनगर : G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट आहे. सुरक्षा दलाचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याच दरम्यान राजौरी आणि बारामुल्ला परिसरात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू झाली आहे. शनिवारी बारामुल्ला चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बारामुल्लाच्या करहामा कुंजर भागात ही चकमक सुरू आहे. दरम्यान, राजौरीतील कंडी जंगलात सध्या दहशतवादविरोधी कारवाई सुरू आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही भागात किमान 8 ते 9 दहशतवादी असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. सर्च ऑपरेशन सुरू असताना एक घरातून अचानक गोळीबार सुरू झाला. त्याला सुरक्षा दलाच्या जवानांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. हा दहशतवादी लष्कर ए तोयबाच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे.
बारामुल्ला परिसरात जवानांकडून सर्च ऑपरेशन जारी करण्यात आलं आहे. लपून बसलेल्या दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे. कुंजर परिसरात सुरक्षा दलाने घेराबबंदी केली आहे. ऑपरेशन त्रिनेत्र असं याला नाव देण्यात आलं. 23 तास हे ऑपरेशन सुरू आहे. घनदाट जंगल, गुहा असल्याने दहशतवादी याचा आधार घेत आहेत. आजही हे सर्च ऑपरेशन सुरू राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.
अजूनही सैन्याचं ऑपरेशन सुरू आहे. खबरदारी म्हणून परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. राजौरी इथे 5 मे रोजी कंडी परिसरात दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली होती. दहशतवाद्यांनी अचानक जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला. यावेळी 5 जवान शहीद झाले आहे. तर 4 जवान जखमी झाले आहे.