काही लोक साप दिसताच त्याला फोनमध्ये कैद करतात. जे त्यांच्या जीवावरही बेतू शकतं.
अनुप पासवान, प्रतिनिधी कोरबा, 23 जुलै : श्रावण सुरू झाला, आता विविध सण-सोहळे साजरे करता येतील. पुढच्याच महिन्यात ‘नागपंचमी’ आहे. या सणानिमित्त सर्वजण सोशल मीडियावरून एकमेकांना शुभेच्छा देतील. अनेकजणांच्या व्हॉट्सअॅप स्टेटस, इंस्टाग्राम, फेसबूक स्टोरीवर सापांचे, नागांचे फोटो पाहायला मिळतील. परंतु लक्षात घ्या, आता सापांना पकडून त्यांचे फोटो, व्हिडिओ काढून व्हायरल करणं आपल्याला चांगलंच महागात पडू शकतं. छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्याच्या वनविभागाने याबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. सापांना पकडून त्यांचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्यांवर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, असं वनविभागाने म्हटलं आहे. यासाठी सर्पमित्रांचं एक पथकही नेमण्यात आलंय. कोरबा भागात सापांना पकडण्यासाठी चार अनुभवी सर्पमित्रांचे क्रमांक वनविभागाने जारी केले असून मदतीसाठी संपर्क करावा, असं आवाहन सामान्य नागरिकांना केलं आहे.
पावसाळ्यात अनेक विषारी प्राणी बिळातून बाहेर पडतात. सुकलेल्या, अंधारलेल्या, सुरक्षित ठिकाणी ते फिरत असतात. त्यामुळे उच्चभ्रू कॉलनींपासून झोपडपट्ट्यांपर्यंत सर्वत्र सध्या साप, नाग आढळण्याच्या घटना घडत आहेत. या सापांना पकडण्यासाठी काही सजग नागरिक सर्पमित्रांना बोलवतात, तर काहीजण स्वतःच त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात. काही लोक तर साप दिसताच कोणतंही पाऊल उचलण्याआधी फोनमध्ये त्याला कैद करतात. जे त्यांच्या जीवावरही बेतू शकतं. लग्नाच्या हॉलमधून निघाली सापांची ‘वरात’; आधी नागीण बाहेर पडली नंतर बेबी कोब्रांची रांग घरात साप शिरल्यावर कोणताही अनुभव नसताना त्याला मारण्याचं धाडस केल्याने त्याच्यापासून आपल्या व आपल्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका पोहोचू शकतो. शिवाय काही सर्पमित्रांनाही फार अनुभव नसतो, ते नागासारख्या विषारी सापांशी सहजपणे सामना करू शकत नाहीत. या सगळ्याचा विचार करून वनविभागाने चार अनुभवी सर्पमित्रांची नेमणूक केली आहे आणि लोकांना सापांचे फोटो, व्हिडिओ न काढण्याची सूचना देण्यात आली आहे.