अजहर खान, प्रतिनिधी सिवनी, 21 जुलै : असे फार क्वचित लोक असतात ज्यांना सापाची भीती वाटत नाही. अन्यथा सर्वांनाच सापाची भीतीही वाटते आणि किळसही वाटतो. आपल्याला कधी एकत्र अनेक साप दिसले तर, काय थरकाप उडेल…मध्यप्रदेशच्या सिवनी भागात एका लग्नाच्या हॉलमध्ये नागाच्या पिल्लांचा भलामोठा घोळका आढळला. नशिबाने इथे कोणत्याही लग्न सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं नव्हतं. त्यामुळे केवळ कर्मचारी उपस्थित होते. सिवनी जिल्ह्यातील लघुरवाडा भागात एक मॅरेज गार्डन आहे. तिथे हा प्रकार घडला. नागाच्या पिल्लांआधी एक 4 फूट लांब नागीण याठिकाणी दिसली होती. सर्पमित्र प्रवीण तिवारी यांनी तिला सुरक्षितरीत्या जंगलात नेऊन सोडलं होतं. तर त्याच्याच दुसऱ्याच दिवशी त्याच जागी नागाची काही पिल्लंही सापडली. त्यानंतर सतत काही दिवस पिल्लं सापडत होती. यामुळे मॅरेज गार्डनचे कर्मचारी चिंतेत होते. गार्डनमध्ये आणखी काही साप दडून बसल्याच्या शक्यतेमुळे त्यांनी खोदकाम सुरू केलं. या खोदकामात थोडे थोडके नाही, तर नागाचे तब्बल 18 पिल्लू सापडले. सर्पमित्रांनी या सर्व नागांना पकडलं आणि जंगलात नेऊन सोडलं.
सर्पमित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व पिल्लू गार्डनमध्ये आढळलेल्या नागिणीचे होते. अलीकडेच त्यांचा जन्म झाला असावा. मात्र असं असलं तरी नागाचे नवजात पिल्लूदेखील अतिशय विषारी आणि धोकादायक असतात. शिवाय ते हातातून पटकन निसटतात त्यामुळे मोठ्या नागांच्या तुलनेत त्यांना पकडणं अत्यंत कठीण असतं.