नवी दिल्ली, 16 मार्च : कोरोनाग्रस्त (Coronavirus) रुग्णांना आयसोलेशन वॉर्डमध्ये (isolation ward) ठेवलं जातं आहे. हे आयसोलेशन वॉर्ड नेमकं असतं कसं असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. दिल्लीतल्या (delhi) कोरोनाव्हायरसच्या पहिल्या रुग्णाने सांगितल्यानुसार, आयसोलेशन वॉर्ड हे लक्झरी हॉटेलपेक्षा (luxury hotel) कमी नाही. दिल्लीतल्या कोरोनाव्हायरसचा पहिला रुग्ण उमेश शर्मा (नाव बदललेलं) यांना शनिवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. सफदरजंग रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. हा वॉर्ड एखाद्या लक्झरी हॉटेलपेक्षा कमी नव्हता, असं त्यांनी हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना सांगितलं. हे वाचा - मुंबईपाठोपाठ नवी मुंबईतही कोरोनाचा नवा रुग्ण, राज्यातील रुग्णांची संख्या 39 वर उमेश शर्मा यांनी सांगितल्यानुसार, ‘एखाद्या सरकारी रुग्णालयातील वॉर्ड कसा असेल, याचा विचार मी केला होता. मात्र सफदरगंज रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्ड माझ्या विचारापलीकडील होता. हा वॉर्ड पाहून मला विश्वासच बसत नव्हता की मी सरकारी रुग्णालयात आलो आहे. एखाद्या लक्झरी हॉटेलपेक्षा हा वॉर्ड कमी नव्हता. कर्मचाऱ्यांनी खूप चांगल्या प्रकारे स्वच्छता राखली होती. रुग्णालयातील बेडशीट दिवसातून दोनदा बदलले जायचे. फरशी वेळा स्वच्छ केली जायची’ रुग्णालयात काही समस्या तर नाही ना, यासाठी खुद्द केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून फोन आल्याचंही उमेश शर्मा यांनी सांगितलं. उमेश शर्मा म्हणाले, ‘केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला. शिवाय प्रकृतीबाबत सविस्तर विचारपूस केली, रुग्णालयात काही अडचण, समस्या तर नाही ना हेदेखील विचारलं. आपण आणि पंतप्रधान मोदी सर्व कोरोनाव्हायरस रुग्णांच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले’ हे वाचा - ‘कोरोना’चा कहर तर बघा, हे वृत्तपत्र पाहून तुम्हीही व्हाल थक्क ‘जेव्हा मला कोरोना असल्याचं निदान झालं, तेव्हा मी खूप घाबरलो. हा नवा आजार आहे आणि आता माझा मृत्यू अटळ आहे, असं मला वाटलं. मात्र डॉक्टरांनी माझ्यात सौम्य लक्षणं आहेत आणि मी लवकर बरा होईल असं सांगितलं. त्यानंतर मला थोडं हायसं वाटलं. ज्या नर्स आणि कर्मचाऱ्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून माझी सेवा केली’, यासाठी उमेश यांनी सर्वांचे आभार मानलेत. 14 दिवस आयसोलेशन वॉर्डमध्ये राहिल्यानंतरही उमेश यांना कधीच एकटं वाटलं नाही. ते स्मार्टफोन वापरत होते, व्हिडीओ कॉलमार्फत कुटुंबाशी बोलत होते आणि जगातील घडामोडींवरही लक्ष ठेवत होते. दिवसातून 2 वेळा ते प्राणायम करायचे, चाणक्यनीती वाचायचे, असं त्यांनी सांगितलं. रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर उमेश आता 14 दिवस होम क्वारंटाइन आहेत. मात्र इतरांनीही सर्वसामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष करून नये, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. हे वाचा - हे फक्त आपल्याच देशात होऊ शकतं! ‘कोरोना’शी दोन हात करणाऱ्या मोदी सरकारला सॅल्युट