नवी मुंबई 16 मार्च : मुंबईपाठोपाठ आता नवी मुंबईतही कोरोनाव्हायरसचा नवा रुग्ण आढळून आला आहे, ज्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 39 वर पोहोचली आहे. आज दिवसभरात राज्यात मुंबईत 4, यवतमाळमध्ये एक आणि नवी मुंबईत एक असे एकूण 6 नवे रुग्ण आढळून आलेत. राज्यात कोणत्या ठिकाणी कोरोनाव्हायरसचे किती रुग्ण आहेत, याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट केलं आहे.
महाराष्ट्रात सध्या कोरोना रुग्णांची संख्या 39 झाली आहे. #CoronaVirusUpdates pic.twitter.com/lnsyWBrlgA
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 16, 2020
आता खबरदारी म्हणून राज्यातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत. शाळा, महाविद्यालय आणि राज्यातील सर्व विद्यापीठ परीक्षा 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात येणार आहे, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. तसंच महापालिका आणि ग्रामपंचायत निवडणुका 3 महिने पुढे ढकलण्याचा निर्णय झाला असून तशी शिफारस निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. हे वाचा - ‘कोरोना’चा कहर तर बघा, हे वृत्तपत्र पाहून तुम्हीही व्हाल थक्क कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता राज्यातील सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. शिवाय मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आणि तुळजापुरातील तुळजाभवानी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.