नवी दिल्ली 16 मार्च : भारतात (India) कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या 114 वर पोहोचली आहे. या व्हायरसचा अधिक प्रसार होऊ नये, यासाठी सरकार टप्प्याटप्प्याने पावलं उचलतं आहे, काही निर्णय घेतं आहे. सरकारने नागरिकांना गर्दीत जाण्यास मनाई केली आहे, काही ठिकाणी जाण्यास बंदी घातली आहे. अशात आता भारतात लॉकडाऊन होणार, अशा आशयाचे मेसेज सोशल मीडियावर फिरू लागलेत. ‘कदाचित 2 दिवसांनी वाहतूक व्यवस्था बंद होणार आहे, त्यामुळे सर्वांनी किमान 10 ते 15 दिवस पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंची सोय करावी, कुटुंबासाठी आवश्यक वस्तूंची सोय करून ठेवावी’, असे मेसेज सोशल मीडियावर येत आहेत. मात्र खरंच यात कितपत तथ्य आहे? हे वाचा - सावधान ! नोटांवरही असू शकतो ‘कोरोना’; कॅश नव्हे डिजिटल पेमेंट करा, RBI चा सल्ला खरंतर कोरोनाव्हायरस जास्त पसरू नये, यासाठी खबरदारी म्हणून सरकारने काही ठिकाणं बंद केलेत. यामध्ये शाळा, विद्यापीठं, जीम, म्युझियम, सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्रे, स्विमिंग पूल आणि थिएटर्स यांचा समावेश आहे. ही सर्व ठिकाणं 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने दिली आहे. मात्र त्यात कुठेही वाहतुकीचा उल्लेख नाही. न्यूज 18 लोकमतच्या पडताळणीत हा व्हायरस मेसेज फेक आहे, हे स्पष्ट होतं.
देशात महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसचे सर्वाधिक 39 रुग्ण आहेत. मात्र त्यामुळे कोणत्याच शहरात लॉकडाऊन करण्यात आलेलं नाही, जीवनाश्यक वस्तूंची दुकानं सुरू राहणार आहेत. असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि राज्यातील सर्व विद्यापीठ परीक्षा 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात येणार आहे. राज्यातील सर्व विद्यापीठ, महाविद्यालय, इंजिनिअर यासह वेगवेगळ्या परीक्षा 31 मार्चपर्यंत असतील त्यांचे पेपर पुढे ढकलण्यात येणार आहे. ज्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहे त्या एप्रिल महिन्यात घेण्यात येतील, पुढील सूचना येईपर्यंत बंद राहणार आहे, असं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. हे वाचा - VIDEO : कोरोना दुसऱ्या स्टेजला, उद्धव ठाकरे म्हणाले, आता स्वयंशिस्त पाळा! ‘राज्यात आगामी काळात महापालिका आणि ग्रामपंचायत निवडणुका येऊ घातल्या आहे. कोरोना व्हायरसची परिस्थितीत पाहत निवडणुका 3 महिने पुढे ढकलण्यात यावा असा निर्णय राज्य सरकारचा झाला आहे. याबद्दल निवडणूक आयोगाला तशी विनंती करण्यात आली आहे’, अशी माहितीही टोपे यांनी दिली. राज्यामध्ये पुण्यात कोरोनाव्हायरसचे सर्वाधिक 16 रुग्ण आहेत. पुण्यातही संचारबंदी किंवा जमावबंदी नाही, असं पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी स्पष्ट केलं.
‘त्यामुळे पॅनिक करू नका, आठवड्याचा सामानाचा स्टॉक ठीक आहे, दोन दोन महिन्यांची शिधा भरण्याची आवश्यकता नाही. दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी करू नका,’ अशी कडक शब्दांमध्ये सूचना पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.
फक्त जिल्हा प्रशासन, राज्य सरकारनेच नव्हे, तर केंद्र सरकारनेही अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन केलं आहे.
त्यामुळे देशातील लॉकडाऊनबाबत तुम्हालाही असे मेसेज येत असतील, तर त्यावर विश्वास ठेवू नका आणि पॅनिक होऊ नका. फक्त व्हायरसची लागण होऊ नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्या. गर्दीत जाणं टाळा, सरकारच्या सूचनांचं पालन करा आणि व्हायरससंबंधित कोणतीही लक्षणं दिसली तर त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांकडे जा. हे वाचा - मुंबईपाठोपाठ नवी मुंबईतही कोरोनाचा नवा रुग्ण, राज्यातील रुग्णांची संख्या 39 वर