'मी अत्यंत भयाण आयुष्य जगतो आहे. त्यांच्या कॉलची मी अद्याप वाट पाहतो आहे.'
साउथ 24 परगणा, 20 जुलै : पश्चिम बंगालमधला एक माजी पोलीस कॉन्स्टेबल आपल्याला पुन्हा नोकरी मिळेल या आशेवर गेली 30 वर्ष दिवस काढतो आहे. सिराजुल हक मांडल असं त्याचं नाव असून, डाव्या सरकारच्या काळात तो पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होता. तेव्हाच्या युवा काँग्रेस नेत्या आणि पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याची नोकरी गेली असल्याचं त्याचं म्हणणं आहे. इतकी वर्ष गेली, सरकारही बदललं, मात्र सिराजुलची परिस्थिती बदललेली नाही. तरीही अद्याप तो आपल्याला पुन्हा नोकरी मिळेल, या आशेवर जगतोय. त्यामुळेच नोकरी जाऊन इतकी वर्ष झाली, तरी त्याने आजही आपला युनिफॉर्म जपून ठेवला आहे. सिराजुल हक मांडल उत्तर 24 परगणा जिल्ह्यातल्या गायघाट पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या इच्छापूरमधल्या भद्रगंगा इथला रहिवासी आहे. 21 जुलै 1993 रोजी तत्कालीन काँग्रेस नेत्या ममता बॅनर्जी यांनी महाकरण चळवळ आयोजित केली होती. त्या दिवशी ममता बॅनर्जी आणि अन्य काँग्रेस नेते महाकरण अर्थात ‘रायटर्स बिल्डिंग्ज’कडे मोर्चा घेऊन निघाले. त्यावेळी 27 वर्षांचा असलेला पोलीस कॉन्स्टेबल सिराजुल ड्युटीवर होता. त्याच्या हातात लांब नळीची बंदूक होती. त्यावेळी कोलकाता पोलीस उपायुक्त दिनेश वाजपेयी यांच्या आदेशावरून पोलिसांनी अचानक लाठीमार सुरू केला. विरोधी पक्षनेते रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडल्याचं समोर पाहिल्यावर सिराजुलने स्पेशल ब्रँच ऑफिसर निर्मल विश्वास यांच्या आदेशावरून आपली सर्व्हिस गन आपले वरिष्ठ दिनेश वाजपेयी यांच्यावर रोखली. ममता बॅनर्जी यांचा जीव वाचवण्यासाठी सिराजुल ओरडला, ‘सर, हा छळ थांबवा. नाहीतर मला तुमच्यावर नाईलाजाने गोळी चालवावी लागेल.’
सिराजुलच्या या पवित्र्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांना धक्काच बसला. कोलकात्यातल्या ब्रेबॉर्न रोडवर हा प्रसंग घडला. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात गेल्याच्या कारणावरून सिराजुलचा तीन वर्ष मानसिक छळ करण्यात आला आणि त्यानंतर त्याला नोकरीतून काढून टाकण्यात आलं. नोकरी पुन्हा मिळवण्यासाठी सिराजुलने कोर्टाच्या पायऱ्या झिजवल्या; मात्र काही उपयोग झाला नाही. पैशांच्या अभावामुळे अखेर त्याने कोर्टाचं दार ठोठावणं बंद केलं. ट्रान्सफॉर्मरचा स्फोट, 16 जणांचा मृत्यू! हृदयद्रावक घटनेचा VIDEO आला समोर आता सिराजुल आपली आई आणि बहीण यांच्यासह एका मोडक्या कुंपणभिंतीजवळ टिनच्या शेडमध्ये राहतो. मजूरी करून त्याने कुटुंबाचं पालनपोषण केलं. परंतु नोकरी पुन्हा मिळवण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरूच आहेत. नगरविकास मंत्री फरहाद हकीम यांच्याशी त्याने चर्चा केली आहे. तसंच काहीवेळा त्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही कालिघाटमधल्या त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे. ‘मी पाहीन’ असं ममतादीदींनी सांगितलं आहे; मात्र अद्याप काहीही झालेलं नाही. सिराजुल कॉलची वाट पाहतच आहे. सिराजुल म्हणाला, ‘नोकरी पुन्हा मिळण्याबाबत मला अद्याप आशा आहे. मी त्यांना वाचवलं, म्हणून माझी नोकरी गेली. त्यामुळे मला खात्री आहे की, एक ना एक दिवस त्या मला नोकरी पुन्हा मिळवून देतील. सत्तेत येण्याआधी त्यांनी सांगितलं होतं की, चांगले बदल घडवून आणू. मात्र माझ्याबाबतीत ते घडत नाहीये. मी अत्यंत भयाण आयुष्य जगतो आहे. त्यांच्या कॉलची मी अद्याप वाट पाहतो आहे.’ 21 जुलैचा दिवस पुन्हा आल्याने त्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, मात्र त्याच्या आणि त्याच्या वृद्ध आजारी आईच्या आवाजातलं दुःख आणि खेद कायम आहे. तो स्वतःला ‘जिवंत हुतात्मा’ म्हणवतो.