संतापजनक घटना
भोपाळ, 6 जुलै : मध्य प्रदेशमधून एक संतापजनक व्हिडीओ समोर आला होता. सीधी जिल्ह्यातील भाजप नेता प्रवेश शुक्ला यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. नशेच्या अवस्थेत ते एका आदिवासी तरुणावर लघवी करत आहे, असे त्या व्हिडिओत दिसले. हे प्रकरण समोर येताच देशात एकच खळबळ उडाली. आरोपी प्रवेश शुक्ला रावत यांच्यावर लघवी केली होती. दरम्यान, आज मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दशमत रावत या व्यक्तीची भेट घेतली. मुख्यंत्र्यांनी धुतले पाय - भाजप नेत्याने एका आदिवासी व्यक्ती लघवी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. भाजपने आरोपी प्रवेश शुक्ला यांच्याविरोधात कडक पावलं उचलली. तर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आरोपीवर एनएसए अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले. यानंतर आज मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री तसेच भोपाळ येथील सीएम हाऊसमध्ये दशमत रावत या व्यकीचे पाय धुतले. तसेच त्यांची माफीही मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यावेळी मागितली. ते म्हणाले, “हा व्हिडिओ पाहून मला खूप दु:ख झाले. मी तुमची माफी मागतो. मला जनता ही देवासारखी आहे”. दरम्यान, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या व्यक्तीचे पाय धुतल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
घटनेनंतर काँग्रेस आक्रमक या घटनेवर काँग्रेसने तिखट प्रतिक्रिया दिली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ म्हणाले, या घटनेने संपूर्ण मध्यप्रदेशची मान शरमने खाली गेली आहे. सिधी जिल्ह्यातील एका आदिवासी तरुणावर लघवी करतानाचा क्रूरतेचा व्हिडिओ समोर आला आहे. आदिवासी समाजातील तरुणांसोबत अशा घृणास्पद आणि हिन कृत्याला सुसंस्कृत समाजात स्थान नाही. दोषीवर कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि मध्यप्रदेशातील आदिवासींवरील अत्याचार थांबवावेत, अशी माझी मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे.