मुंबई, 28 जून : मुंबईच्या घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळलं आहे. सर्वोदय रुग्णालयाजवळ हे विमान कोसळलं आहे.रहिवासी परिसरात हे विमान कोसळल्याने खळबळ उडालीय. या विमानाच्या भीषण अपघातात पायलटसह 5 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात एक पायलट, 3 तंत्रज्ञ आणि 1 पादचारी मृत्यू पावलेत. ‘KING AIR C90’ असं या अपघातग्रस्त विमानाचं नाव आहे. दरम्यान हे विमान उत्तर प्रदेश सरकारने मुंबईच्या ‘UY AVIATION’ या कंपनीला विकलं असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. घाटकोपरच्या रहिवासी भागात हे विमान कोसळलं आहे.
विमानाचं टेक ऑफ झाल्यानंतर लगेचंच विमानाचा अपघात झाला. मोठ-मोठे आवाज झाल्यानंतर आगीचे लोळ परिसरात पसरले. दरम्यान या विमानात 7 ते 8 जण प्रवास करत असल्याची माहिती आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, एका इमारतीच्या टेरेसवर हे विमान कोसळलं आहे. यात पायलटसह 5 जणांचा मृत्यू झाला आहे. यात एक पादचारी असल्याचं सांगण्यात येत आहे. 
