उल्हासनगर, 29 नोव्हेंबर: मांत्रिकानं सांगितलं तुली मूलबाळ होणार नाही, अस म्हणत सासरच्या लोकांनी विवाहितेला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भिवंडी येथे हा घडला आहे. सासरच्या लोकांनी केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या पीडितेवर उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सुरुवातीला टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो भिवंडी पडघा पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. सासारच्या लोकांविरोधात भादंवी कलम 498 (अ) मारहाण करणे, धमकवणे या कलमानुसार भिवंडी-पडघा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा… प्रियकराला कंटाळून मुलीची आत्महत्या; धर्म परिवर्तनासाठी करत होता बळजबरी मिताली पाटील असं मारहाण झालेल्या विवाहितेचं नाव आहे. सासरच्यांनी इतकी अमानुष मारहाण केली आहे की, तिच्या शरीरावर काळे निळे वळ उमटले आहेत. आपटी गावात राहणाऱ्या मितालीचं 15 जून 2020 रोजी भिवंडी देवरुंग पाडा इथे राहणाऱ्या देवेश पाटील याच्या सोबत लग्न झाले होते. मात्र, लग्नाच्या 15 दिवसानंतर लगेच पतीचे मामा, मामी आणि नवऱ्याने तिचा छळ सुरू केला. सासरच्यांना एका मांत्रिकानं सांगितलं की, मितालीला मूलबाळ होणार नाही. त्यानंतर सासरच्या लोकांनी तिचा छळ सुरू केल्याचं मितालीनं सांगितलं. 24 नोव्हेंबर रोजी रात्री सासरच्या लोकांना एका चारचाकी गाडीत कोंबून बेदम मारहाण करत माहेरी आपटी या गावातील घरातील अंगणात टाकून दिलं, असंही मितालीनं पोलिसांना सांगितलं. इतका अमानुष छळ करणाऱ्या सगळ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी मितालीनं केली आहे. या प्रकरणी सुरुवातीला टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो भिवंडी पडघा पोलीस ठाण्यात वर्ग केला असून सासारच्यांच्या विरोधात भिवंडी पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा… संजय राऊत का शरद पवार यांचे वकीलपत्र घेतात, सुधीर मुनगंटीवारांनी फटकारलं मितालीच्या भावाचा पोलिसांवर आरोप… मात्र, मितालीनं जवाब दिल्याप्रमाणे पोलिसांनी नोंद केली नाही, असा आरोप मितालीच्या भावाने केला आहे. या प्रकरणात सासरीच्या मंडळींना वाचवण्याचा प्रयत्न होत असून आम्हाला जीवे ठार मारण्याचा धमक्या दिल्या जात असल्याचं त्यानं सांगितलं आहे. तर पीडित अजून रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे पुन्हा तिचा जवाब घेऊन सखोल तपास करून पुढची कारवाई करू, असे पडघा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सांगितले आहे.