अजित पवारांना का हवंय राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद?
मुंबई, 22 जून : विरोधी पक्षनेतेपदातून मुक्त करा, आपल्याला या पदामध्ये रस नाही. आपल्याला संघटनात्मक काम करायचं आहे, असं वक्तव्य अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमात केलं आहे. अजित पवारांचं हे वक्तव्य म्हणजे त्यांची नजर प्रदेशाध्यक्ष पदावर असल्याचं सांगण्यात येत आहे, पण अजित पवारांना राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद का हवं आहे? याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद साद घालतंय. अवघ्या सव्वा वर्षावर विधानसभा निवडणुका आलेल्या आहेत. या निवडणुकांमध्ये अजित पवारांना फ्रंटफूटवर राहून पक्षाचा प्रचार करायचा आहे. अजित पवार प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी इतके आग्रही आहेत की, त्यांनी वर्तमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील किती वर्षापासून पदावर आहेत, याचाही हिशेब मांडला. जयंत पाटील 5 वर्ष एक महिना प्रदेशाध्यक्षपदावर असल्याचं अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी भुजबळ आशावादी, स्वत:सोबत घेतली आणखी तिघांची नावं अजित पवारांना प्रदेशाध्यक्षपद का हवं आहे? हा प्रश्न सर्वांना पडलाय. प्रदेशाध्यक्षपदावर असल्यावर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तिकीट वाटपावर अजित पवारांचं वर्चस्व राहिल. अजित पवारांना त्यांच्या समर्थकांना तिकीट देता येईल. महाविकास आघाडीतल्या इतर घटक पक्षांसोबत अजित पवार वाटाघाटी करू शकतील. या प्रकरणी संघटनात्मक पातळीवर निर्णय घेतला जाईल, असं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं. सुप्रिया सुळेंकडे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यापासून अजित पवार नाराज झाल्याची चर्चा सुरू होती. त्यातच अजित पवारांनी संघटनात्मक जबाबदारी मागितल्यानं राष्ट्रवादीत सर्वकाही आलबेल नसल्याचं स्पष्ट झालंय. प्रदेशाध्यक्ष पदावर असलेल्या नेत्याला मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता जास्त असते. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यपदावरून थेट मुख्यमंत्री झाले. 2019 मध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते. आता अजित पवारांना जर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली तर 2024 मध्ये दादा मुख्यमंत्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजितदादांनी इच्छा बोलून दाखवली अन् जयंत पाटलांनी व्यासपीठावरच दिलं उत्तर, म्हणाले…