अजित पवार
प्रशांत बाग, मुंबई, 18 एप्रिल : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. यावरून अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीकडून त्या त्या वेळी याबाबत स्पष्ट करण्यात आलंय. दरम्यान, आता विरोधी पक्षनेत्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरीवर अजित पवार कधी येणार याची कोणालाच माहिती नाहीय. अजित पवार यांच्याकडे कामानिमित्त भेट घेण्यासाठी येणारे त्यांच्या भेटीसाठी प्रतीक्षेत आहेत. अजित पवार यांच्याशी संपर्क झाला नाही किंवा त्यांनी एखादा दौरा अचानक रद्द केला, बदलला तर लगेच वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात होते. त्यात अजित पवार भाजपच्या वाटेवर, राष्ट्रवादी फुटीच्या मार्गावर, पवारांच्या घरात कलह, ही तर शरद पवारांचीच चाल, सत्तेशिवाय पवारांना राहताच येत नाही, पवार काका-पुतण्यात अंतर्गत धुसफूस, अजित पवारांचा आजार होता राजकीय, विश्रांतीच्या नावाखाली, अजित पवारांचा गुप्त दौरा, जरंडेश्वर आरोप पत्रात, अजित पवार यांना पत्नी सुनेत्रासह क्लीनचिट, ही अजित पवारांच्या भाजपसोबत पुढील वाटचालीची नांदी अशा एक ना अनेक चर्चा रंगतात. विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार? भाजप आमदाराकडून मोठा गौप्यस्फोट शरद पवार, अजित पवार यासह राष्ट्रवादीचे नेत्यांनाही याबाबत खुलासा करावा लागतोय. अजित पवारांच्या हालचालींकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, अजित पवारांच्या या शासकीय देवगिरी बंगल्यात,सकाळपासून अगदीच सामसूम आहे. पवार रात्रीपासून इथे आलेच नाही, असं चौकशी केल्यावर सांगितलं जातंय. आलेल्या अभ्यागतानाही 11 वाजता, विधिमंडळ कार्यालयात भेटतील हे सांगून रवाना केलं जातंय. कायम खुला असलेला, अजित पवार यांच्या देवगिरी या बंगल्याचा दरवाजा बंद असल्यानं कंड्या पिकणं तर सुरूच आहे. कितीही नकारघंटा पवारांनी वाजवली तरी एक मात्र खरं की आग लागल्याशिवाय धूर निघत नाही.
मलबार हिलवर असलेल्या देवगिरी या बंगल्यात सामसूम वातावरण आहे. अजित पवार काल रात्रीपासून या बंगल्याकडे आलेले नाहीत. आज ते बंगल्यावर येणार असल्याचं म्हटलं जातंय. बंगल्यावर बारामतीहून आलेले काही नागरीक अजित पवार यांच्या प्रतिक्षेत आहे. दादा, कुठे आहेत? कधी येणार? याबद्दल बंगल्यावर कुणालाच नेमकी माहिती नाही. देवगिरी बंगल्याचं प्रवेशद्वारही बंद असून ते कधीतर उघडतं. पोलिसांकडून बाहेर प्रतीक्षेत असलेल्या अभ्यागतांची नोंद घेतली जाते. पण अजित पवार देवगिरीवर कधी येणार हे मात्र कुणी सांगत नाहीय. दरम्यान, अजित पवार यांनी काल अचानक त्यांचे सासवडमधील कार्यक्रम रद्द केल्यानं राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं होतं. मात्र खारघर इथं महाराष्ट्र भूषण सोहळ्यावेळी उष्माघाताने झालेल्या १३ मृत्यूच्या घटनेनंतर अजित पवार यांनी त्यांचे कार्यक्रम रद्द केल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. तसंच अजित पवार हे देवगिरी बंगल्यात असल्याचंही सांगण्यात आलं होतं.