वर्धा, 20 जुलै: आपण रोज चंद्राला बघत असतो. तरीही रोजचा चंद्र वेगळा भासतो. चंद्राच्या नेहमी बदलत जाणाऱ्या कलांबाबत आपल्याला प्रश्नही पडत असेल. त्याबाबत जाणून घेण्याचं कुतूहलही असेल. तर चंद्र कोरपासून चंद्र पूर्ण दिसण्यापर्यंतचा प्रवास कसा असतो ? आणि अमावस्या आणि पोर्णिमा कधी असते.? याचा चंद्राशी संबंध काय? याबाबतच वर्धा येथील खगोल अभ्यास किशोर वानखेडे यांनी आंतरराष्ट्रीय चंद्र दिवसांच्या निमित्ताने अगदी सोप्या भाषेत आणि सर्वांना समजेल अशी माहिती दिली आहे. चंद्र स्वयंप्रकाशित नाही चंद्र पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करीत असतो. पृथ्वी आणि चंद्र हे दोघेही एकमेकांसोबत सूर्याभोवती फिरत आहेत. चंद्र जरी आकाराने गोल चेंडूसमान असला, तरी तो खूप दूर असल्याने पृथ्वीवरून मात्र चंद्रबिंब सपाट वर्तुळाकार वाटते. चंद्र हा ताऱ्यांप्रमाणे स्वयंप्रकाशित नाही. चंद्रावर सूर्याचा जो प्रकाश पडतो, तो परावर्तित होतो, त्यामुळे चंद्राचा तेवढाच प्रकाशित झालेला भाग आपल्याला दिसतो, असे वानखेडे सांगतात.
का बदलतात चंद्राच्या कला? चंद्राच्या परिभ्रमणातील त्याच्या पृथ्वीच्या संदर्भात असणाऱ्या विविध स्थानांमुळे, त्यावर पडणाऱ्या प्रकाशित भागाचेच दर्शन आपल्याला होत असते. परंतु त्याचा अंधारातला भाग पटकन समजून येत नाही. अर्थात, जे प्रकाशित चंद्रबिंब वेगवेगळ्या आकारात आपल्याला दिसते, त्यालाच आपण चंद्राच्या कला असे म्हणतो. चंद्राचे स्थान रोज बदलत असते त्यामुळे या कला रोज बदलतात, असेही वानखेडे यांनी सांगितले. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बनवलं अनोखं यंत्र, एका तासात 7 हजार रोपांची लावणी का साजरा केला जातो चंद्र दिवस ? मानवाने 1969 मध्ये चंद्रावर पहिले पाऊल टाकले. तो दिवस म्हणून चंद्र दिवस साजरा केला जातो. 20 जुलै 1969 या दिवशी अमेरिकेचे सुप्रसिद्ध अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांच्या रूपाने मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले होते. अपोलो 11 नावाच्या यानातून आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरले, तेव्हा ते 38 वर्षाचे होते. त्यानंतर हा दिवस चंद्र दिवस म्हणून साजरा होतो.