उद्धव ठाकरे
मुंबई, 11 मे : आज राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल हाती आला आहे. सुप्रीम कोर्टाकडून हे प्रकरण विधासभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आलं आहे. आता या प्रकरणात विधानसभा अध्यक्षांचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान हा निर्णय देताना सुप्रीम कोर्टानं असंही निरीक्षण नोंदवलं की, जर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर कदाचीत सरकार परत आलं असतं. सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे जर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता तर हे सरकार कदाचित परत आले असते असं सुप्रीम कोर्टानं आजचा निर्णय देताना म्हटलं होतं. यावर उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. कायदेशीरदृष्ट्या राजीनामा दिला ही चूक असू शकते, पण नैतिकता बघितली तर ज्या पक्षाने आणि माझ्या वडिलांनी ज्यांना सगळं दिलं त्यांच्यासाठी मी विश्वास आणि अविश्वास का दाखवू? असा सवाल करतानाच मी राजीनामा दिला नसता तर मी पुन्हा मुख्यमंत्री झालो असतो, पण माझ्यासाठी ही लढत नाहीये. माझी लढाई राज्यासाठी आणि देशासाठी आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्यापालांवर निशाणा दरम्यान यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन राज्यपालांवर देखील निशाणा साधला आहे. राज्यपालांची भूमिका संशयास्पद म्हणण्याची गरज नसून ती अयोग्य ठरली आहे. राज्यपाल ही यंत्रणा आदरयुक्त होती, पण शासनकर्त्यांनी धिंडवडे काढले आहेत, ते पाहिल्यानंतर राज्यपाल यंत्रणा अस्तित्वात ठेवावी की नाही, याचा विचार केला पाहिजे. राज्यपालांना अधिवेशन बोलवण्याचा अधिकार नव्हता. पण अपात्रेतचा निर्णय हा अध्यक्षांवर जरी सोपवला असेल तरी शिवसेनेचा व्हीप लागू होणार आहे. खऱ्या शिवसेनेचा निर्णय राहणार आहे, त्यामुळे आता अध्यक्ष महोदयांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.