एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस
मुंबई, 13 डिसेंबर : हिवाळी अधिवेशनाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला 19 डिसेंबरपासून नागपुरात सुरुवात होणार आहे. 19 डिसेंबर ते 29 डिसेंबर असा दोन आठवडे या अधिवेशनाचा कालावधी आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र आता यावरून विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अधिवेशन कमीत कमी तीन आठवड्याचं हवं अशी मागणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. विविध मुद्द्यांवरून विरोधकांना सरकारला घेरण्याची संधी आहे. पाहुयात अधिवेशनात नेमके कोणते विषय वादळी ठरू शकतात. महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य राज्यात गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्याची मालिका सुरू आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप नेते प्रसाद लाड आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील वादग्रस्त व्यक्तव्य केलं होतं. हा वाद शांत होतो न होतो तोच आता मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. यावरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना मदत चालू आर्थिक वर्षामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र अनेकांना मदत मिळालीच नाही, तर ज्यांना मिळाली ती मदत देखील अपुरी असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. हा मुद्दा विरोधक अधिवेशनात उपस्थित करण्याची शक्यता आहे. राज्याबाहेर जाणारे प्रकल्प शिंदे, फडणवीस सरकारच्या काळात अनेक मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने सुरू आहे. हा मुद्दा देखील अधिवेशनात चांगलाच गाजण्याची शक्यता आहे. राज्याबाहेर जाणाऱ्या प्रकल्पावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. हेही वाचा : शरद पवार यांच्यानंतर आता भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी; पोलिसात तक्रार दाखल ईडी कारवाई महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची सध्या चौकशी सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे जेलमध्ये आहेत. तर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना देखील पत्राचाळ प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यामुळे हा मुद्दा देखील अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. हेही वाचा : चिनी सैनिक गुजरात निवडणुकीची वाट पाहत होते का? संजय राऊतांचा पुन्हा भाजपवर हल्लाबोल
मंत्रिमंडळ विस्तार शिंदे, फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब झाला होता. यावरून विरोधकांनी सरकारवर टिकेची झोड उठवली होती. हिवाळी अधिवेशनापूर्वी सरकार मंत्रिमंडळ विस्तार करणार असल्याची चर्चा होती. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनासाठी आपल्याकडे असलेली अतिरिक्त खाते इतर मंत्र्यांना दिली आहेत. यावरून देखील विरोधक शिंदे, फडणवीस सरकारला कोंडित पकडू शकतात.