मुंबई, 17 फेब्रुवारी : महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या मध्यावधीपासूनच थंडी गायब झाल्याने उन्हाचा चटका जाणवत आहे. मागच्या चार दिवसांपासून उन्हाच्या झळा असह्य होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यात पारा 35 अंशावर जाऊन पोहोचला आहे. यामुळे पुढच्या तीन महिन्यात आणखी तिव्रता वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान राज्यातील मुंबई, सोलापूर, रत्नागिरी, अलिबाग, अकोला, ठाणे जिल्ह्याचा पारा 37 अंशावर गेला आहे. याचबरोबर काही जिल्ह्यात अद्यापही थंडी कायम आहे. नाशिक, जळगाव, कोल्हापूर या भागात दिवसा उन्हाचा चटका तर रात्री थंडी अशी परिस्थिती आहे. या हवामान बदलाचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत असल्याचे दिसून येत आहे.
हे ही वाचा : Sangli : पिकांच्या वाढीला लागणारा महत्त्वाचा घटक महागला, शेतकऱ्यांचं बजेट कोलमडलं, Video
मुंबईसह राज्यभरात कमाल तापमानाच्या चढया पाऱ्याने कहर केला आहे. मागच्या 24 तासांत राज्यभरात बहुतांश शहरांचे कमाल तापमान 35 अंशापुढे नोंदविण्यात आले आहे. दरम्यान मुंबईचा पारा 37.5 अंश सेल्सिअस एवढा नोंदविला गेला आहे. महाराष्ट्रात 22 फेब्रुवारीपासून किमान तापमानाचा पारा घसरून थंडी पुन्हा पडण्याची शक्यता आहे. असे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.
दरम्यान उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात घट कायम असून, धुळे आणि पुणे येथेही पारा 10 अंशांच्या खाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात कमाल तापमानात वाढ कायम आहे. निरभ्र आकाश, स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे कमाल तापमान पस्तिशी पार आहे. रत्नागिरी येथे 37 अंश, तर वर्धा येथे 36 अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर जळगाव, सांगली, औरंगाबाद, परभणी, अमरावती, ब्रह्मपुरी, गोंदिया, वाशीम येथे पारा 35 अंशांच्या वर होता.
हे ही वाचा : दुष्काळी भागात फुलली स्ट्रॉबेरीची शेती, पाहा कशी झाली कमाल! Video
राज्यात मागच्या 24 तासांत पुणे 34.1 (9.4), जळगाव 35.2 (8), धुळे 34 (9.4), कोल्हापूर 34.7 (17.8), महाबळेश्वर 30.5 (15.9), नाशिक 33.5 (10.7), निफाड 34 (6.8), सांगली 35.3 (16.2), सातारा 34.7 (15.4), सोलापूर 37.2 (15.3), डहाणू 30.6 (17.9), रत्नागिरी 37 (20.6), औरंगाबाद 35 (11.7), परभणी 35.5 (14.5), अकोला 37.2 (13 .9), अमरावती 35.8 (13.9), बुलडाणा 33 (16.2), चंद्रपूर 33.2 (14.6), गडचिरोली 32.6 (12.6 ), गोंदिया 32.5 (13.2), नागपूर 34.7 (14.7), वर्धा 36 (15.9), वाशिम 35.2 (14.8), यवतमाळ 34.2 (14.5) तापमानाची नोंद झाली.