स्वप्निल एरंडोलीकर, प्रतिनिधी
सांगली, 2 फेब्रुवारी : अनिश्चित पाऊस, वाढती मजुरी, रासायनिक खतांचा वाढता दर यामुळे शेतीचे अर्थकारण बिघडले आहे. मागील काही वर्षात अतिवृष्टी, बदलते हवामान यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. तर दुसरीकडे खतांच्या किंमती वाढत असल्याने सांगलीतील शेतकरी दुहेरी कचाट्यात सापडला आहे. खत कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किंमतीत भरमसाठ वाढ केल्याने शेतीतील उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसणे कठीण झाले आहे.
गेली वर्षभरापासून खतांच्या किमतीत टप्प्याटप्प्याने वाढ होत आहे. खतांच्या या वाढत्या किमतीमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. खतांच्या वाढत्या किमती कमी व्हाव्यात, शेतमालास योग्य भाव मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातील शेती व शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था सातत्याने कोलमडत आहे.
शेती आर्थिकदृष्ट्या तोट्यात
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण प्रामुख्याने शेती व्यवसायावर अवलंबून आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकरी द्राक्ष, ऊस व अन्य धान्य पिकांचे उत्पादन घेत आहे. खत म्हणजे पिकांचा प्राण आहे. खतांशिवाय पिकांचे उत्पादन घटते. त्यामुळे महागडी खते, औषधे वापरून शेतकऱ्यांच्या उत्पादित द्राक्ष, ज्वारी, भाजीपाला या मालास दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची शेती आर्थिकदृष्ट्या तोट्यात चालली आहे.
जपानी पद्धतीनं सांगली झाली हिरवीगार, 2 वर्षांमध्येच तयार झालं जंगल, Video
खर्च अधिक व उत्पन्न कमी
मजुरी, औषधे- खतांचे वाढलेले दर यामुळे शेतीचे अर्थकारण बिघडल्याचे चित्र आहे. बळी राजाला उत्पादित शेतमाल कमी दराने विकावा लागत असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची खर्च अधिक व उत्पन्न कमी अशी अवस्था झाली आहे. तसेच शेतकऱ्यांना विविध प्रश्नांमुळे आर्थिक नुकसान सोसावे लागत असते. कधी अस्मानी, तर कधी सुलतानी संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येत आहे. असे खतांचे दर वाढतच आहेत. त्यामुळे बळी राजाला खर्चाचा ताळमेळ घालणे जिकिरीचे बनले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.