देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे
विरेंद्रसिंग उत्पात, प्रतिनिधी सोलापूर, 11 जून : भाजप-शिंदे गटाच्या युतीमधील धुसफूस हळुहळू समोर येताना पाहायला मिळत आहे. ठाण्यानंतर सोलापूर जिल्ह्यातही युतीत ठिणगी पडल्याचे दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यातील भाजप आणि शिवसेनेतील धुसपूस समोर आली आहे. पालकमंत्री विखे पाटील वेळ देत नसल्याचा आरोप शिवसेना माढा लोकसभा संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांनी केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील प्रशासनाला फक्त भाजपच्याच लोकांची काम करा, असा लिखित आदेश दिल्याचा आरोप संजय कोकाटे यांनी केलेला आहे. जिल्हास्तरीय समितीच्या नेमणुका अद्याप झालेल्या नाहीत जर एकनाथ शिंदे बरोबर आले नाहीत तर भाजपची काय अवस्था होईल याचा त्यांनी विचार करावा, असा इशारा भाजप नेतृत्वाला दिलेला आहे. युतीमध्ये मिठाचा खडा पडतोय का? एकंदरीत भाजप आणि शिवसेना युतीमध्ये मिठाचा खडा पडतोय का? यावर महाविकास आघाडीचे नेतृत्व लक्ष ठेऊन असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष पदावर सुप्रिया सुळे यांच्या निवडीवर भाकरी फिरवली का करपली असा प्रश्न उपस्थित करणारे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील शिवसेनेच्या संजय कोकाटे यांच्या आरोपांवर सारवासारव करताना दिसत आहेत. भाजप मधील मोहिते-पाटील, परिचारक घराण्यातील नेत्यांशीच संपर्क असल्याचा आरोप असताना सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेला गृहीत धरले जात असल्याचा आरोप होणे साहजिक आहे. जिल्हा नियोजन बैठक असो किंवा आषाढी वारीची आढावा बैठक पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील शिवसेनेच्या नेते आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम करताना दिसत नाहीत. वाचा - Political news : मोठी बातमी! कर्जत बाजार समितीमध्ये सभापती, उपसभापती भाजपचेच, रोहित पवार यांना शिंदेंचा मोठा धक्का आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या महाआरोग्य शिबीर व जिल्हा नियोजन समितीचा एकमेकांत ताळमेळ दिसत नसून मंदिर परिसरात उन्हापासून बचाव करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या पत्राशेड बांधण्याच्या निर्णय वास्तवात आणणे शक्य नसल्याने त्याला विरोध होत आहे. एकदंरीत स्थानिक प्रश्न हाताळताना शिवसेनेचे अस्तित्व फक्त आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या गटापुरते सिमीत असल्याने विखे पाटील यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने शिवसेना नेत्यांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. संजय कोकाटे यांनी केलेल्या आरोपांमुळे त्याला कुठेतरी वाट मिळाली आहे. एकंदरीत एकमेकांवर आरोप करणारे महाविकास आघाडी असो किंवा युतीमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार नाराजीवर भरपरून बोलणारे नेते युती मधील अतंर्गत धुसफूसवर मात्र सारवासारव करत असल्याने सगळे काही आलबेल नाही हे लक्षात येते आहे.