सावरकरांच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं
नवी दिल्ली, 28 मार्च : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. सोमवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी झालेल्या विरोधकांच्या बैठकीत शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्यासमोरच या मुद्द्यावरून नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच रविवारी झालेल्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनीही या मुद्द्यावरून राहुल गांधींना सुनावलं होतं. राहुल गांधींच्या वक्तव्याला विरोध म्हणून विरोधकांच्या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कोणताही नेता सहभागी झाला नव्हता. आता संजय राऊत यांनी राहुल गांधींची भेट घेतली आहे. शिवसेनेचा मुद्दा समजून घेत आता काँग्रेस सार्वजनिक कार्यक्रमात सावरकरांचं नाव घेणार नाही, यावर एकमत झालं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. काय म्हणाले संजय राऊत? ‘राहुल गांधींशी माझं बोलणं झालं आहे. काँग्रेस अध्यक्षांशीही बोलणं झालं आहे. सावरकर विषयावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी काल आणि आज बोलणं झालं आहे. काल खर्गेंच्या घरी बैठक झाली त्यात शरद पवारांपासून जवळपास सगळ्याच विरोधी पक्षनेत्यांनी ही भूमिका घेतली की सावरकरांचा मुद्दा काढण्याची गरज नाही. आपल्याला मोदींशी लढायचं आहे का वीर सावरकरांशी लढायचं आहे. हे ठरवा गोंधळ निर्माण करू नका’, असं संजय राऊत राहुल गांधींना भेटल्यावर म्हणाले, पण राहुल गांधींसोबत नेमकी काय चर्चा झाली, यावर विस्तृत माहिती द्यायला त्यांनी नकार दिला. पवारांची कठोर भूमिका विरोधी पक्षांच्या बैठकीत शरद पवार यांनी सावरकर वादाचा मुद्दा काढला. जर भाजपविरोधात आघाडी उभी करायची असेल तर मतभेद असणारे मुद्दे बाजूला सारले पाहिजेत असं परखड मत शरद पवारांनी व्यक्त केलं. या बैठकीत हजर असलेल्या राहुल गांधींनीही सहमती दर्शवल्याचं खासदार संजय राऊतांनी सांगितलं.