(संजय राऊत)
नवी दिल्ली, 28 एप्रिल : ‘बारसूमध्ये गावकऱ्यांना बदडून काढत आहे. दिल्लीने सांगितले आहे, त्यामुळे काही झाले तरी रिफायनरी करण्याचा आदेश दिला. राज्यात मोगलाई सुरू आहे’ असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. बारसू रिफायनरीचा मुद्या पुन्हा एकदा पेटला आहे. आज सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या कर्मचारी आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. यावेळी पोलिसांनी अनेकांवर लाठीचार्ज केल्याचं सांगितलं जात आहे. या राड्यावर राऊतांनी संताप व्यक्त केला. ‘बारसूमध्ये महिलांचा अपमान होत आहे. फडणवीस हे परदेशात गेले आहे. शिवसेना हे सहन करणार नाही. चर्चा करायला तयार असताना असे का सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचे कोण ऐकत आहे. दिल्लीच्या मोगलाई आदेश आहे, अशी टीका राऊत यांनी केली. ‘महाराष्ट्राचे अर्धे पोलीस दल हे राजापूर आणि बारसूमध्ये आहे. बाहेरचे लोक नाही. आपल्या नातेवाईकांचे संरक्षण करण्यासाठी आले. उदय सामंत जमीनच मालक कोण आहे सांगा. आम्ही सगळे उतरू आणि बांबू घालू, असा इशाराही राऊतांनी दिला. (बारसूमध्ये पुन्हा राडा, पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट, घटनास्थळाचा पहिला VIDEO) ‘मुख्यमंत्र्यांनी गुलामी सोडून राजीनामा झाला. विनाशकारी प्रकल्प सुरू झाला आहे. आम्ही प्रतिकार करू, अन्याय अत्याचार करणाऱ्याविरोधात लढाई लढू.. हे सैतान आहेत. शिवाजी महाराज या सर्वांना शाप देणार आहे, असंही राऊत म्हणाले. दरम्यान, बारसू सोलगाव पंचक्रोशीत होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला होणारा विरोध आज अधिक तीव्र झाला. भू सर्वेक्षणासाठी विरोध झाल्यानंतर प्रशासनाने आक्रमक होत महिलांसह प्रकल्प विरोधातील महत्त्वाच्या लोकांना अटक केली. त्यानंतर राजापूरमध्ये लोकांमध्ये आणखी राग निर्माण झाला होता. प्रकल्पाबाबत लोकांचे नेतृत्व करणाऱ्यांना अटक केल्यानंतर होणारा विरोध मावळेल अशी आशा असताना आज आंदोलनाला वेगळे वळण लागलं.
गुरुवारी संध्याकाळी प्रशासन,तज्ञ,प्रकल्प समर्थक आणि विरोधक यांच्या एक संयुक्त बैठक पार पडली,मात्र या बैठकीत शेतकरी आणि मच्छिमारांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देण्यात प्रशासन आणि तज्ञांना अपयश आल्यामुळे ही बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे या प्रकल्पाला असलेला विरोध आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेचे स्थानिक खासदार विनायक राऊत आणि प्रकल्प विरोधी संघटनेचे अशोक वालम यांनी या लढ्यात सक्रिय भाग घेतला आहे. आज सकाळीच पोलिसांनी राऊत यांना ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर आंदोलकांनी सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना अडवण्यासाठी धाव घेतली. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली.