स्वप्नील एरंडोलीकर, प्रतिनिधी सांगली, 5 जून: प्रत्येकाला आपल्या देशाविषयी अभिमान असतो. काही वेळा आपल्या कृतीतून तो व्यक्तही केला जातो. सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथे रोज सकाळी सायरन वाजतो आणि ग्रामस्थांना सार्वजनिक आवाहन केलं जातं. त्यानंतर संपूर्ण गावच 52 सेकंदासाठी स्तब्ध उभं राहतं. गावातील रोजच्या व्यवहारांची सुरुवात राष्ट्रगीतानेच होते. देशभक्तीचा अनोखा आदर्श निर्माण करणारं भिलवडी हे देशातील सहावे गाव आहे तर नियमित राष्ट्रगीत वाजविले जाणारे हे महाराष्ट्रातील पहिलेच गाव ठरले आहे. रोज सकाळी वाजतो सायरन सांगली जिल्ह्यातील भिलवडीच्या व्यापाऱ्यांनी तीन वर्षांपूर्वी एक टोन सेट केला आहे. सकाळचे 9 वाजले की अचानक सायरन वाजतो. त्यानंतर पब्लिक अॅड्रेस सिस्टीममधून एक आवाहन केल जातं. ‘व्यापारी आणि ग्रामस्थ बंधू भगिनींनो राष्ट्रगीत सुरू होत आहे. आपण भारतीय आहोत. देशाबद्दल आपल्याला अभिमान आहे. आपण सच्चे देशप्रेमी आहोत. आपणाला विनंती आहे राष्ट्रगीताचा आदर करा. जिथे आहे तिथे उभे राहा.’ तेव्हा संपूर्ण गावातील लोक स्तब्ध उभे राहतात आणि राष्ट्रगीत होतं.
तीन वर्षांपासून सुरू आहे परंपरा भिलवडीतील व्यापारी संघटनेने राष्ट्रगीताची अनोखी संकल्पना सुरू केली. ही परंपरा गेल्या तीन वर्षांपासून अखंड सुरू आहे. रोज सकाळी दिनविशेष, त्यावर आधारित एक प्रेरणादायी गाणं आणि बरोबर 9 वाजून दहा मिनिटांनी राष्ट्रगीत हा रोजचा ठरलेला कार्यक्रम झाला आहे. व्यापारी संघटनेच्या पब्लिक ऍड्रेस सिस्टिमवरून हे राष्ट्रगीत लावलं जातं आणि त्याचा सर्व व्यापारी आणि ग्रामस्थ मान राखतात. पुण्यातलं हे गाव आहे शहरापेक्षा भारी, खुद्द राष्ट्रपतींनीही केलं कौतुक GROUND REPORT देशभक्तीचा सकारात्मक संदेश गावात येणाऱ्या नवख्या व्यक्तीसाठी हे आश्चर्यचकित होण्यासारखं आहे. मात्र, इथल्या ग्रामस्थांसाठी हा आपल्या देशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयोग आहे. 15 ऑगस्ट 2020 पासून भिलवडीत PA प्रणालीद्वारे ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत रोज वाजवण्यास सुरुवात झाली. तेव्हा देशभक्तीचा उत्साह काही दिवसांत किंवा आठवड्यात कमी होईल, असा काहींचा समज होता. मात्र, हा समज खोटा ठरला असून गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. महाराष्ट्रातील या छोट्याशा गावाने खूप सकारात्मक संदेश दिला आहे.