स्वप्नील एरंडोलीकर, प्रतिनिधी सांगली, 26 एप्रिल: फाईव्ह जी इंटरनेटच्या जमान्यात सगळं काही ऑनलाइन झालं. टीव्ही, मोबाईलच्या आभासी विळख्यात तरुणाई अडकली. व्हिडिओ, रिल्स, गेम्सच्या व्यसनात सोशल साईटवर किती टाईमपास होतो, याचे भानच या पिढीला नसल्याची सार्वत्रिक ओरड आहे. जीवनप्रवास समृद्ध करण्यासाठी पुस्तके हीच झाडाच्या सावलीप्रमाणे असतात, हा विचार प्रत्यक्ष कृतीत आणून सांगलीत एक कुटुंब पुस्तकांच्या प्रेमात पडलंय. संपूर्ण जाधव कुटुंबानंच वाचन संस्कृती जोपासली आहे. जाधव कुटुंबाचा ‘वाचाल तर वाचाल’चा संदेश सांगली शहरातील भारत चौकात असणाऱ्या जाधव परिवाराच्या तिसऱ्या पिढीने ‘वाचाल तर वाचाल’ हा मंत्र जपलाय. जाधव कुटुंबीय मूळचे वारणा काठच्या समडोळी गावचे आहे. मात्र काळाच्या ओघात ते ‘सांगलीकर’ झाले. घरात जाधव कुटुंबीयांची 35 सदस्यांची पाचवी पिढी राहते. कुटुंबीय तसे नोकरदार लोकांचे आहे. सर्व सदस्य खासगी नोकरीसह महापालिका, बँक सेवेत आहेत.
वाचन संस्कृती टिकवण्यास कुटुंबापासून सुरुवात बँक कर्मचारी असलेल्या आनंदराव जाधव यांना वाचनाचा छंद आहे. कथा, कादंबऱ्या, चरित्रग्रंथ असे सर्व प्रकारचे वाङ्मय त्यांनी झपाटल्यासारखे वाचले. मन, मेंदू सशक्त राहण्यासाठी वाचनाची सवय जडायला हवी, हा संस्कार त्यांनी पेरला. निवृत्तीनंतर त्यांनी महात्मा गांधी ग्रंथालयात कार्यवाहपदाची जबाबदारी स्वीकारली. वाचनसंस्कृती टिकवण्याची सुरवात त्यांनी घरापासून केली. त्यांचे बंधू, मुलगा, मुलगी भावजय, पुतणे असे सारेच या छंदाकडे ओढले गेले आहेत. Sachin Tendulkar Birthday: संपूर्ण गावानं गुढी उभारून साजरा केला सचिनचा वाढदिवस, Video कुटुंबात होते पुस्तकांवर चर्चा जाधव यांचे स्वतःचे सुवर्णमहोत्सवी श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेशोत्सव मंडळ आहे. शिवाय आई-वडिलांच्या नावाने शेवंता रघुनाथ साहित्य मंचही उभारला आहे. आनंदराव यांचा ‘शब्दानंद’ चारोळीसंग्रह लवकरच प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे शिवजयंतीसह घरगुती सण, उत्सव, लग्न, वाढदिवस एकत्र साजरे करताना जोडीला वाचन असतेच. कुटुंबात नव्या-जुन्या पुस्तकांवर चर्चा होतात. धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक पुस्तके विकत घेऊन वाचनावर कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा भर असतो.