स्वप्नील एरंडोलीकर, प्रतिनिधी सांगली, 13 मार्च: जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. यंदा या द्राक्षांच्या निर्यातीस गती आली आहे. वर्षाच्या सुरवातीलाच युरोप आणि आखाती देशांत 4 हजार 605 टन द्राक्षाची निर्यात झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली. कृषी विभागाने द्राक्ष निर्यात वाढण्यासाठी पुढाकार घेतला असून सांगली जिल्ह्यातील गावा-गावात जनजागृती केली जात आहे. द्राक्ष निर्यात करणाऱ्यांच्या संख्येत वाढ सांगली जिल्ह्यातून गेल्या 2 ते 3 वर्षांपासून द्राक्ष निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. यंदाच्या हंगामात एकूण 9 हजार 515 शेतकरी द्राक्षाची निर्यात करणार आहेत. मात्र, द्राक्ष निर्यातीसाठी दलालांची साखळी सक्रिय झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांची 50 कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे निर्यात करण्यासाठी शेतकरी धाडस दाखवत नसल्याचे चित्र सध्या आहे.
33 हजार 791 हेक्टर क्षेत्रावर द्राक्षांची बाग सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी गेल्या पाच वर्षांपासून वेगवेगळे प्रयोग करत शेतीत नवनवीन प्रयोग राबवत अनेक नव्या जाती विकसित केल्या आहेत. जिल्ह्यात जवळपास 33 हजार 791 हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष बागांमधून जवळपास 11 जातीचे सुमारे 9 लाख टन द्राक्षांचे उत्पादन घेतले जात आहे. त्यामुळे जिल्ह्याची वार्षिक उलाढाल ही हजारो कोटींच्या घरात गेली आहे. त्यामुळे सांगली जिल्हा हा नाशिक पाठोपाठ द्राक्षांचे हब म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. Success Story : अबब! तब्बल पाऊण किलोचा कांदा! विश्वास बसत नसेल तर पाहा Video द्राक्षांची परदेशात निर्यात देशांतर्गत बाजारपेठेसह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत द्राक्ष विक्रीला जातात. जिल्ह्यातून यंदाच्या हंगामात द्राक्ष निर्यातीसाठी 9 हजार 515 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. 5 हजार 309 हेक्टरवरील द्राक्ष सातासमुद्रापार जाणार आहेत. गेल्यावर्षी जिल्ह्यातून 5 हजार 947 शेतकऱ्यांनी नोंदणी करून 2 हजार 766 हेक्टरवरील द्राक्षांची 16 हजार 358 टन द्राक्षे निर्यात झाली होती. गतवर्षी निर्यातक्षम द्राक्षाला प्रति किलोस 90 रुपये असा दर मिळाला होता. हंगाम मध्यावर आल्यानंतर प्रति किलोस 85 रुपये असा दर होता. हंगाम संपेपर्यंत द्राक्षाचा दर स्थिर राहिला. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. युरोप आणि आखाती देशात निर्यात वास्तविक पाहता, यंदाचा हंगाम उशिरा सुरू झाला. त्यातून द्राक्षाची निर्यात संथगतीने सुरू होती. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून द्राक्ष निर्यातीस गती आली आहे. जिल्ह्यातून आखाती देशात 195 कंटेनर म्हणजे 2 हजार 925 टन तर युरोपियन देशात 140 कंटेनर म्हणजे 1 हजार 680 टन अशी एकूण 4 हजार 605 टन द्राक्षे निर्यात झाली आहेत. Photos: टोमॅटोला फक्त 2 रुपये किलो भाव, निराश शेतकऱ्यानं पिकांमध्ये सोडली जनावरं! यंदा दर घसरले यंदा हंगामाचा प्रारंभ ८० रुपये असा दर शेतकऱ्यांना मिळाला. अगदी गेल्या पंधरा दिवसांपर्यंत दर स्थिर होते. मात्र, त्यानंतर दरात 5 ते 10 रुपयांची घसरण झाली. सध्या द्राक्षाला प्रति किलोस सरासरी ७० असा दर मिळत आहे. एका आठवड्यात द्राक्षाचे दर कमी झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना ताळमेळ घालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. जिल्ह्यातील सुमारे 21 हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षे देशांतर्गत बाजारपेठेत जातात. यामध्ये तामिळनाडू, कर्नाटक, चेन्नई, दिल्ली, मुंबई, पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील सुमारे 8 लाख 40 हजार टनहून अधिक द्राक्षांची निर्यात केली जाते. निर्यातीच्या आमिषाखाली फसवणूक दरवर्षीच्या द्राक्ष हंगामात व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक हे जणू समीकरणच झाले आहे. यावर्षी तर हंगामाच्या पहिल्या महिन्यातच 40 लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. द्राक्ष हे नाशवंत पीक आहे. ते वेळेवर काढून बाजारात पोहचणे गरजेचे असते. त्याचाच गैरफायदा घेऊन दरवर्षी कोट्यवधीचा गंडा शेतकऱ्यांना घालत असल्याची स्थिती आहे. Sangli News: दुष्काळी जतच्या माळावर चक्क सफरचंदाची शेती, पाहा शेतकऱ्याची कमाल, Video शेतकऱ्यांनी योग्य काळजी घ्यावी दरवर्षीच्या फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत, तर दुसरीकडे शेतकरी कोणतीही काळजी न घेता द्राक्ष व्यापाऱ्यांना द्राक्षे देताना दिसत आहेत. वास्तविक द्राक्षे व्यापाऱ्यांचे पूर्ण नाव गाव माहीत असणे अपेक्षित आहे. मात्र, तसे दिसत नाही. व्यापाऱ्याचा मध्यस्थ म्हणून स्थानिक दलाल काम करतो. त्याच्यावर विश्वास ठेवून शेतकरी द्राक्ष देतात आणि नंतर तो मध्यस्थ दलाल ही हात वर करून रिकामा होतो. आतापर्यंत अशाच पद्धतीने फसवणूक झाल्याचे पुढे आले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन अपेक्षित आहे.