राष्ट्रवादीच्या व्हीपचा पेच, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय म्हणाले?
तुषार रुपनवार, प्रतिनिधी मुंबई, 10 जुलै : महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 17 जुलै ते 4 ऑगस्ट 2023 पर्यंत चालणार आहे. तीन आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनाआधी विधानसभा अध्यक्षांसाठी मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतरचं हे पहिलंच अधिवेशन आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, एवढच नाही तर अजित पवार गटाकडून आपणच राष्ट्रवादी असल्याचा दावा केला जात आहे. यासाठी त्यांनी निवडणूक आयोगातही दाद मागितली आहे. पावसाळी अधिवेशनामध्ये शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी कुणाची? हे ठरवण्याचं आव्हान विधिमंडळासमोर आहे. पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादीतही व्हीपवरून वाद होऊ शकतो. राष्ट्रवादीच्या आमदारांच्या आसन व्यवस्थेतही बदल होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांना तूर्त निलंबित करण्याची मागणी जयंत पाटील यांनी केली आहे, पण तूर्त निलंबनाची तरतूद नसल्यामुळे ही मागणी फेटाळली जाण्याची शक्यता आहे. शपथविधी झाला, पण खातेवाटप नाही, अजितदादांचं मंत्रिपद ‘जीआर’ने फोडलं? व्हीपचा पेच ‘व्हीपची नेमणूक करण्याचा अधिकार राजकीय पक्षाला आहे, असं सुप्रीम कोर्ट म्हणाले आहे. मूळ पक्ष कुणाचा याची खात्री होत नाही, तोपर्यंत व्हीपचा निर्णय घेणं अवघड आहे, त्यामुळे आधी मूळ राजकीय पक्ष कोणता हे बघावं लागेल. पावसाळी अधिवेशनातल्या आसन व्यवस्थेवर योग्य निर्णय घेऊ,’ असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले आहेत. ‘जयंत पाटील यांची याचिका दाखल झाली आहे, या याचिकेची स्फुटणी सध्या सुरू आहे, त्याची खात्री पटल्यानंतर पुढची कारवाई करू,’ अशी प्रतिक्रिया नार्वेकर यांनी दिली आहे. तसंच शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत पुन्हा एकदा नोटीस पाठवल्या आहेत, सात दिवसांची मुदत त्यांना देण्यात आली आहे. पत्र प्राप्त झाल्यानंतर सात दिवसांच्या आत त्यांना अभिप्राय कळवायचा आहे, अशी माहिती राहुल नार्वेकर यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात, अजितदादा-शरद पवार एकाच व्यासपीठावर येणार? तारीख ठरली!