दोन वेगवेगळ्या अपघातात 7 ठार
किशोर गोमाशे, प्रतिनिधी नांदेड/वाशिम, 19 जून : राज्यात सोमवार अपघात वार ठरला आहे. दोन वेगवेगळ्या अपघातात तब्बल 7 जणांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या घटनेत नांदेडच्या सिताखंडी घाटात टेम्पो आणि टाटा मॅजिक वाहनाच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहेत. आज दुपारी चार वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर स्थानिक नागरीक आणि पोलिसांनी जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात ऑटोचा वरचा पत्रा उडून गेला. तर मृतांना बाहेर काढण्यासाठी टाटा मॅजिकचा पत्रा कापावा लागला. तर दुसरी घटना वाशिम जिल्ह्यात घडली. रिसोड महामार्गावरील नागठाणा फाट्याजवळ मिनी ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात घडला असून यामध्ये दुचाकी वरील तीनजण जागीच ठार तर मिनी ट्रकचालक गंभीर जखमी झाला आहे. कसा झाला अपघात? नांदेड-भोकर मार्गावर सोमवारी दुपारी टाटा मॅजिक प्रवासी घेऊन नांदेडहून भोकरकडे जात होता. भोकर तालुक्यातील सीताखंडी घाटावर येताच समोरून भरधाव वेगाने नांदेडकडे येत असलेल्या विटांच्या ट्रकने टाटा मॅजिकला जबर धडक दिली. अपघातात वाहनामधील भुलाबाई गणेश जाधव (वय 45 रा. पोटातांडा, ता. हिमायतनगर), संदिप किशनराव किसवे (वय 26, रा. हळदा ता. भोकर), संजय ईरबा कदम (वय 48 रा. हिमायतनगर), बापुराव रामसिंग राठोड (वय 57 रा. पाकीतांडा, ता. भोकर) या चार प्रवाश्यांचा जागीच मृत्यू झाला. वाचा - चालत्या रिक्षात महिलेचा गळा चिरला, स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न; तपासात धक्कादायक माहिती तर परमेश्वर केशव महाजन (रा. इरसनी) कैलास गणपत गडमवार (रा. सिरंजणी ता. हिमायतनगर), मंगेश गोविंदराव डुकरे (वय 22 रा. लहान ता. अर्धापूर) आणि देवीदास गणेश जाधव ( रा. पोटातांडा) हे गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. ट्रकच्या धडकेनंतर टाटा मॅजिकचा चुराडा झाला होता. अनेक जण वाहनामध्ये अडकले होते. मृतांना काढण्यासाठी वाहनाचा वरील पत्रा कापावा लागल्याचे स्थानिकांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच भोकर आणि बारड महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी मयत आणि जखमींना भोकर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वाशीम-रिसोड मार्गावर अपघातात मामा भाचा ठार… रिसोड महामार्गावरील नागठाणा फाट्याजवळ मिनी ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात घडला असून यामध्ये दुचाकी वरील तीनजण जागीच ठार तर मिनी ट्रकचालक गंभीर जखमी झाला आहे. मिनी ट्रक रिसोडकडून वाशिमला तर दुचाकी वाशिमवरुन येवतीला जात होती. भरधाव असलेल्या दोन्ही वाहनांमध्ये जोरदार धडक होऊन भीषण अपघात घडला. यामध्ये दुचाकीवरील दिनकर गायकवाड, गणेश शिंदे आणि आकाश जाधव हे तिघे जागीच ठार झाले तर मिनी ट्रक चालक गोपाल कुलाळ हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातामध्ये दुचाकीचा चुराडा झाला असून मिनी ट्रक पलटी झाला. या अपघातामधील तिघांपैकी दिनकर गायकवाड आणि आकाश जाधव आणि दिनकर गायकवाड हे मामा भाच्याचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर काही वेळ वाहतूक खोळंबली होती.