मुंबई, 19 जून : मुंबईतील साकीनाका परिसरात सोमवारी दुपारी एका व्यक्तीने चालत्या ऑटो-रिक्षात एका महिलेचा गळा चिरला आणि नंतर त्याच धारदार शस्त्राने स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न केला. साकीनाका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना दत्त नगरमधील खैरानी रोडवर घडली. दरम्यान, या घटनेत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. काय आहे प्रकरण? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिपक बोरसे पंचशीला जमादार या महिलेसोबत रिक्षात बसून चालले होते. चालत्या रिक्षात त्याने धारदार शस्त्राने तिचा गळा चिरला. सुटकेसाठी तिने प्रयत्न केले. मात्र, थोडे अंतर गेल्यावर ती खाली पडली. यानंतर बोरसे याने त्याच धारदार शस्त्राने स्वतःवर वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अधिकारी म्हणाले, “प्रवाशांनी पोलिसांना कळवले. दोघांनाही जवळच्या रुग्णालयात नेले असता महिलेला मृत घोषित करण्यात आले. आरोपीवर उपचार करण्यात आले." महिला आणि आरोपी एकमेकांना ओळखत होते आणि रिक्षामध्ये काही कारणावरून झालेल्या भांडणानंतर ही घटना घडली, असेही त्यांनी सांगितले. बोरसे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. वाचा - प्रेम, अनैतिक संबंध अन् धोका! विवाहितेने तरुणाला घडवली अद्दल; ‘नवऱ्याने टाकलं..’ तपासात धक्कादायक माहिती उघड मृत महिलेचं लग्न झालेलं असून तिला एक मुलगा व एक मुलगी आहे. पतीसोबत पटत नसल्याने ती तिच्या आईकडे संघर्ष नगर येथे राहत होती. आरोपी दीपक बोरसे याच्यासोबत तिचे प्रेम संबंध होते. रिक्षामध्ये वाद झाल्याने दीपकने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला व त्यात तिचा मृत्यू झाला. मात्र, हत्येचे नेमकं कारण काय? याबाबत पोलीस तपास घेत आहेत. दीपक हा हत्येच्या इराद्यानेच रिक्षामध्ये बसला होता. त्यामुळेच त्याने त्याच्याकडील हत्याराने तिचा गळा चिरला व स्वतः देखील जखमी झाला. पोलिसांनी आरोपी दीपकला आता ताब्यात घेतले असून अटकेची कारवाई सुरू असून अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.