काँग्रेसचाही विरोधी पक्षनेतेपदावर दावा
मुंबई, 2 जुलै : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप घडला आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या 9 आमदारांसह मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद मिळालं आहे, तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, धर्मराव अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल भाईदास पाटील यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे आमदार असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. तसंच आपण राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून सत्तेत सहभागी झालो आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. याशिवाय आपण आगामी निवडणुका भाजप-शिवसेनेसोबत घड्याळ या चिन्हावरच लढवणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं. काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच अजित पवार यांनी आपण शुक्रवारीच विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला होता, असं सांगितलं आहे. अजित पवारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती केली आहे, याशिवाय त्यांना पक्षाचा विधानसभेतला प्रतोद म्हणूनही जाहीर केलं आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत भूकंप, अजितदादांच्या शपथविधीवर उद्धव ठाकरेंची एका ओळीची रिएक्शन एकीकडे राष्ट्रवादीने विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती केलेली असतानाच दुसरीकडे काँग्रेसनेही विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. काँग्रेस पक्ष 4 जुलैला विरोधी पक्षनेता ठरवणार आहे. आमदारांच्या बैठकीत याबाबतचा निर्णय होणार आहे. यानंतर 5 जुलैला काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले दिल्लीला जाणार आहेत. पक्षश्रेष्ठींच्या निर्णयानंतर काँग्रेस विरोधी पक्षनेत्याचं नाव जाहीर करणार आहे. कुणाकडे किती आमदार? काँग्रेसकडे सध्या 45 आमदारांचं संख्याबळ आहे. तर शरद पवारांसोबत सध्या 15 ते 20 आमदार आणि उद्धव ठाकरेंसोबत 14 आमदार आहेत. आकडेवारीवरून काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद जाऊ शकतं, पण राष्ट्रवादीने आधीच विरोधी पक्षनेते पदाच्या नावाची घोषणा केल्यामुळे आता महाविकासआघाडीमध्ये नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.