साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर, 13 फेब्रुवारी : प्रेमी युगुलांकडून गड किल्ल्यांवर जाऊन त्या पवित्र ठिकाणाची विटंबना केली गेल्याचे प्रकार बऱ्याचदा घडत असतात. पण याच आपल्या गडकिल्ल्यांच्या ऐतिहासिक ठेव्याला नमन करत कोल्हापूर च्या एका प्रेमी जोडप्याने लग्न केले होते. पाण्यात उभ्या असणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर आपली लग्नगाठ बांधत त्यांनी आजही आपले दुर्गप्रेम जपले आहे. सुखदेव शामराव गिरी हे 2000 साली शाहूवाडी तालुक्यातील शित्तुर येथून कोल्हापुरात येऊन स्थायिक झाले होते. तेव्हापासून ते कोल्हापुरात पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहेत. तर त्यांची पत्नी निलांबरी सुखदेव गिरी या कणकवलीच्या गोठणे येथील आहेत. निलांबरी या वकीलीचे शिक्षण घेण्यासाठी कोल्हापुरात आल्या होत्या. 2000 सालीच किल्ले पन्हाळा-पावनखिंड या ट्रेकिंग वेळी सुखदेव आणि निलांबरी यांची भेट झाली होती. तिथे झालेल्या त्यांच्या मैत्रीचे रूपांतर 4 वर्षात प्रेमात झाले. पुढे 2004 साली त्यांनी लग्न करण्याचा विचार केला.
Love Story : विद्यार्थी संघटनेत जुळली मनं, विरोधाला प्रेमानं जिंकत केला सत्यशोधक विवाह, Video
पहिली भेट ते लग्नगाठ गडावरच दुर्गभ्रमंतीची आवड असल्यामुळे मैत्री झाल्यावरच सुखदेव आणि निलांबरी यांनी एकत्र गडकिल्ले मोहीम सुरू ठेवली होती. आजवर राजगड, विशाल गड, पावन गड, पावना, वासोटा असे अनेक किल्ल्यांना भेटी त्यांनी दिल्या आहेत. एकत्र 50 पेक्षा जास्त किल्ले आत्तापर्यंत त्यांनी सर केले आहेत. खरंतर याच मोहिमा करताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींचे निर्णय घेतले होते. पन्हाळा-पावनखिंड या मोहीमे दरम्यान पन्हाळगडावरच पहिली भेट झाली होती. तर किल्ले गगनगडावर एकमेकाला आयुष्याचा जोडीदार बनवण्याचा निश्चय केला होता. आणि तेव्हा शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन अशा एका गडावरच आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करायची असेही ठरवले. मग बरेचसे गड फिरल्यानंतर सिंधुदुर्ग किल्ल्यावर लग्न करण्याचे अखेर निश्चित झाले, असे निलांबरी यांनी सांगितले.
कसा पार पडला सिंधुदुर्ग किल्ल्यावर विवाह? सध्या सिंधुदूर्ग किल्ला केंद्रसरकार द्वारे संरक्षित स्मारक आहे. मग तिथे लग्न करण्याचा निर्णय घेतल्यावर भारतीय पुरातत्त्व विभागाकडून परवानगी घेणे गरजेचे होते. ती परवानगी घेऊन संभाजीराजे छत्रपती यांच्या मदतीने आणि मार्गदर्शनाखाली सिंधुदूर्ग किल्ल्यावर हा लग्नाचा विचार पुढे नेण्यात आला होता. ते स्वतः या विवाह सोहळ्याला उपस्थित राहिले होते, असे सुखदेव यांनी सांगितले. या विवाह सोहळ्याला साधारण 500 जण गडावर उपस्थित होते. आमचे नातेवाईक आणि महाराष्ट्रातील काही प्रमुख शिवभक्त, दुर्गप्रेमी या लग्नाला आले होते. किल्ले सिंधुदूर्गवर जाण्यासाठी बोटीतून जावे लागते. समुद्रकिनाऱ्यापासून किल्ल्यावर सर्व वऱ्हाड हे बोटीतून गडावर गेले होते. कोकणी पद्धतीच्या शाकाहरी जेवणाची मेजवानी देखील गडावरच देण्यात आली होती, अशी आठवण देखील गिरी यांनी सांगितली आहे.
Love Story : जोडीदाराचे डोळे जाणार हे माहिती असूनही ‘त्यांनी’ केलं लग्न! Videoसिंधुदुर्ग किल्लाच का निवडला ? खरंतर सिंधुदुर्ग हा किल्ला म्हणजे आपल्या स्वराज्यातील एक अमूल्य ठेवा आहे. तसे तर स्वराज्यातील सर्वच गडकिल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा वावर होता. पण यांपैकी सिंधुदुर्ग किल्ला हा शिवरायांनी बांधला होता. किल्ल्यावर मुख्य मंदिरात शिवरायांच्या प्रतिमेची पूजा केली जाते. शिवपुत्र राजाराम महाराज यांनी हे मंदिर बांधले असून मंदिराच्या समोरचा सभामंडप राजर्षी शाहू महाराजांकडून बांधण्यात आला, त्यामुळेच या किल्ल्यावर लग्न करण्याचे ठरवले होते, असे सुखदेव गिरी यांनी सांगितले. लग्नानंतर आजही गड किल्ल्यांना भेट लग्न होऊन इतकी वर्षे झाली असली तरी देखील कामाच्या व्यापातून वेळ काढून आम्ही दुर्गभ्रमंती करत असतो. दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याला किल्ले रायगडावर देखील आमचा दोघांचाही सक्रिय सहभाग असतो. त्या शिवाय विविध गडकिल्ल्यांवर आम्ही जात असतो. आम्ही असे ठरवलेले आहे की वर्षांतून ठराविक काळ किल्ल्यांवर भेट देण्यासाठी जायचेच. फक्त आम्ही दोघेच नाही तर आमची आई, 2 भाऊ, 5 बहीणी, माझ्या 2 मुली आणि 1 मुलगा असा सर्व परिवार मिळून आम्ही ही दुर्गभ्रमंती आवर्जून करत असतो, असे देखील सुखदेव गिरी यांनी स्पष्ट केले.