साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर, 11 फेब्रुवारी : घरच्यांनी कितीही विरोध केला तरी जोडीदारावरील भक्कम विश्वासामुळे काही जोडपी आयुष्य सुंदर बनवतात. कोल्हापूरचे प्रशांत आणि आरती हे यापैकीच एक आहेत. दोघांचीही जात वेगळी असल्यानं त्यांच्या लग्नाला सुरूवातीला विरोध झाला. पण, त्यांनी सर्व विरोधाचा एकत्रिपणे सामना केला. अखेर त्यांच्या घरच्यांना विवाहाला परवानगी द्यावी लागली. काय आहे पार्श्वभूमी? प्रशांत आंबी हे कोल्हापूरच्या राजेंद्रनगर येथील रहिवासी आहेत. इंडिया स्टुडंट्स फेडरेशन या विद्यार्थी संघटनेत 2012 साली त्यांनी कार्यकर्ता म्हणून काम करायला सुरुवात केली होती. ते सध्या या संघटनेचे राज्य सचिव आहेत. त्याचबरोबर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कौन्सिल सदस्य देखील आहेत. उदर निर्वाहासाठी ते फोटोग्राफी करत ऑनलाईन पद्धतीनं बुक गॅलरी चालवतात. त्यांच्या पत्नी आरती 2014 साली AISF शी जोडल्या गेल्या. आरती सध्या ऑल इंडिया युथ फेडरेशनच्या नॅशनल वर्किंग कौन्सिल मेंबर आहेत. त्याशिवाय त्यांची स्वतःची साऊ सोशल फाउंडेशन ही सामाजिक संस्था महिला आणि विद्यार्थी प्रश्नांसाठी काम करते. कोरोनानंतर त्यांनी किराणा दुकान सुरू केले होते. सध्या त्या कायद्याचं शिक्षण घेत आहेत. धर्माच्या भिंती तोडून केलं लग्न, पाहा कसा सुरू आहे नाशिकच्या आसिफ-रसिकाचा संसार, Video कसं जुळलं प्रेम ? प्रशांत आणि आरती यांची ओळख विद्यार्थी संघटनेमुळेच झाली. संघटनेच्या एका कार्यक्रमात प्रशांतला पाहून आरती यांना त्यांच्यात स्वतःच्या वडिलांची प्रतिमा दिसायची. यामुळेच त्या प्रशांत यांच्या प्रेमात पडल्या. दोघे एकत्रपणे संघटनेचे काम करता करता एकमेकांचे जीवनसाथी होण्याची स्वप्न रंगवू लागले.
या लग्नात प्रमुख मुद्दा जातीचा होता. त्यामुळे दोघेही याबाबत पुढे विचार करताना घाबरत होते. त्यातही संघटनेत काम करत असल्यामुळे त्या दोघांनी आंतरजातीय सत्यशोधक विवाह करण्याचा निश्चय केला होता. पण, घरचे आणि नातेवाईक या गोष्टीला तयार होत नव्हते. बऱ्याच गोष्टींचा अडथळा पार करत अखेर 3 जुलै 2022 रोजी प्रशांत आणि आरती यांचा विवाहसोहळा कोल्हापूरच्या शाहू स्मृती स्मारकामध्ये संपन्न झाला.
कसा असतो सत्यशोधक विवाह? लग्नकार्यात धार्मिक रितीरिवाजांना फाटा देत हा विवाह केला जातो. या विवाहात तांदुळाच्या अक्षता ऐवजी फुलांच्या पाकळ्या वापरल्या जातात. सर्वत्र लग्नात सर्वांना समजतील अशा सामान्य शब्दातील मंगलाष्टका म्हटल्या जातात. वधू आणि वर महात्मा फुले लिखित शपथा घेतात. त्यानंतर लग्नगाठ म्हणून महासत्यगाठ बांधली जाते. आपापल्या सोयीनुसार आणि काळानुसार यामध्येही काही कमी जास्त बदल जोडपी करत असतात. Love Story : जोडीदाराचे डोळे जाणार हे माहिती असूनही ‘त्यांनी’ केलं लग्न! Video प्रशांत आणि आरती या दोघांना देखील आंतरजातीय आणि तोही सत्यशोधक विवाह यावर आपापल्या घरातील अंदाज होता. आई देवदासी असल्याने प्रशांतने घरातून विवाहाला मोठ्या विरोधाचा सामना केला. तर आरतीचे वडील कट्टर शिवसैनिक असल्यामुळे ते देखील लग्नाला तयार होणार नाहीत असं आरतीला वाटत होते. या सगळ्या परिस्थितीत पळून जाऊन लग्न करण्याचा विचार दोघांच्या मनात आला होता. पण मनातून खचून न जाता दोघांनी प्रयत्न केले. आणि आज ते अगदी सुखात आयुष्य जगत आहेत.