JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोल्हापूरचा बासुंदी चहा एकदा पिऊन तर पहा! रात्री देखील असते मोठी गर्दी, Video

कोल्हापूरचा बासुंदी चहा एकदा पिऊन तर पहा! रात्री देखील असते मोठी गर्दी, Video

Kolhapur News : कोल्हापूरमधील एका महिलेचा चहा देखील सध्या चांगलाच फेमस आहे. येथील बासुंदी चहा पिण्यासाठी नेहमी गर्दी होत असते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर, 9 मार्च :  चहाला वेळ नसते मात्र वेळेला चहा मात्र हवाच.. असं नेहमी म्हंटलं जातं. कित्येक चहाच्या टपरीवर रात्री-अपरात्री देखील भली मोठी गर्दी असते. कोल्हापूरमधील एका महिलेचा चहा देखील सध्या चांगलाच फेमस आहे. नारायणी बासुंदी चहा असं याचं नाव असून तो पिण्यासाठी इथं नेहमी मोठी गर्दी असते. काय आहे खासियत? कोल्हापूर शहरात संध्याकाळी 4 नंतर फेरफटका मारत असाल, तर कोल्हापूर महानगरपालिका चौकात नारायणी बासुंदी चहाचा गाडा आहे. या गाड्यावर मिळणाऱ्या चहाची आणि मसाले दुधाची चव चाखायला लोक लांबून येत असतात. जयश्री राजेंद्र गवळी या हा गाडा चालवतात. कोल्हापूरच्या सोमवार पेठ लक्ष्मी रोडवर 40 वर्षांपासून त्यांच्या सासऱ्यांच्या वडिलांनी सुरू केलेली चहाची गाडी आहे. त्यांच्या घरात परंपरागत हा चहाचा व्यवसाय सुरू आहे. जयश्री यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांनी घरच्या मंडळींना सोबत घेऊन महानगरपालिके शेजारी हा बासुंदी चहाचा गाडा सुरू केला होता. सध्या त्यांच्या घरची चौथी पिढी हा व्यवसाय करत आहे.  त्या अत्यंत सफाईदारपणे हा व्यवसाय सांभाळत आहेत. आपल्या चहाच्या चवीची सर्वांना भुरळ पडली आहे. आरोग्यदायी तांब्याच्या बंबातील चहाची चवच न्यारी….पाहा Video कशी झाली सुरूवात? सात वर्षांपूर्वी म्हणजेच 2016 साली कोल्हापुरात जेव्हा बासुंदी चहाची इतकी क्रेझ नव्हती. शहरात फक्त 2-3 ठिकाणी हा चहा मिळत असते. त्यावेळी जयश्री यांनी या चहाची सुरूवात केली.  कोल्हापूरकरांना काहीतरी नवीन चव देण्याच्या हेतूने त्यांनी ही सुरुवात केली होती. सध्या जयश्री यांच्या जाऊबाई मंगल आणि सुवर्णा, पुतणे प्रविण, निलेश, शैलेश आणि दीर बाळकृष्ण हे परिवारातीलच सदस्य एकत्र इथे चहाच्या गाड्यावर काम करतात. संध्याकाळी 4 ते रात्री 12 पर्यंत हा गाडा सुरू असतो.

कसा बनतो बासुंदी चहा ? एका वेळी सहा लिटर दुधाचा बासुंदी चहा बनवला जातो. मोठ्या पातेल्यात हे दूध तापवून 15 मिनिटं तो उकळला जातो. त्यानंतर त्यात चहा पावडर, साखर, घरीच तयार केलेला चहाचा मसाला टाकला जातो. आमची वेगळी पद्धत म्हणजे हा चहा आटवून बनवला जातो. उकळायला ठेवलेले कोरे दूध आटल्या शिवाय आम्ही त्यात चहा पावडर टाकत नाही. त्यानंतरच त्या चहाला बासुंदी चहाचे रूप येते. त्याचबरोबर बनवलेला चहा हा काही मिनिटे ढवळत ठेवावा लागतो. त्यानंतर त्याला एक वेगळी चव येते, असे जयश्री यांनी सांगितले. रोज किती होते विक्री ? आम्हाला साधारण 20 ते 25 लिटर दूध लागते. मसाले दूधाची देखील 20 ते 30 लिटर विक्री रोज होत असते, असे जयश्री यांनी सांगितले.  त्यांच्याकडे असणाऱ्या बासुंदी चहाची किंमत 10  रुपये  तर मसाले दुधाची किंमत  10, 20 आणि 30 रुपये इतकी आहे. पत्ता : नारायणी बासुंदी चहा, कोल्हापूर महानगरपालिकेच्या इमारती शेजारी, कोल्हापूर - 416002 संपर्क (शैलेश गवळी) : +918888890055

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या