साईप्रसाद महेंद्रकर,प्रतिनिधी कोल्हापूर, 4 एप्रिल : राज्यात भरणाऱ्या देव-देवतांच्या यात्रांपैकी पश्चिम महाराष्ट्रातील वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा ही एक प्रमुख आणि मोठी यात्रा असते. लाखो भाविक या यात्रेत सहभागी होण्यासाठी या ठिकाणी येत असतात. त्यांच्या सेवेचे कार्य दरवर्षी कोल्हापुरातील विविध संस्था करत असतात. यंदाच्या यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी मोफत अन्नछत्र चालवण्याचे काम कोल्हापुरातील सहजसेवा ट्रस्ट करत आहे. चैत्र महिन्यात भरणाऱ्या जोतिबाच्या यात्रेमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातून सात ते आठ लाख यात्रेकरू मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. या यात्रेसाठी आपापल्या भागातून सासनकाठ्या घेऊन यायची परंपरा आहे. लाखोंच्या संख्येने यात्रेसाठी येणाऱ्या जोतिबा भक्तांच्या सेवेसाठी कोल्हापूरच्या सहजसेवा ट्रस्ट या सेवाभावी संस्थेतर्फे गेली 22 वर्षे सातत्याने जोतिबा डोंगरावरील गायमुख या परिसरामध्ये अन्नछत्र चालविण्यात येते. प्रति वर्षाप्रमाणे यंदाही हे अन्नछत्र दिनांक 2 एप्रिल पासून हे अन्नछत्र सुरू झाले असून ते 6 एप्रिल पर्यंत दिवस-रात्र सुरू असणार आहे. मागील वर्षीच्या गर्दीवरुन यंदा दोन लाखांवर यात्रेकरू या अन्नछत्रास भेट देतील, या अंदाजाने या अन्नछत्रात संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. जोतिबाच्या डोंगरावर खेटे का घातले जातात? पाहा कशी सुरू झाली परंपरा Video कुणासाठी आहे अन्नछत्र? ही यात्रा नियोजनबद्ध होण्याकरिता कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभाग, पोलीस दल, होमगार्ड, वन विभाग, बांधकाम विभाग, ग्रामपंचायत, परिवहन विभाग, विद्युत विभाग, त्याचबरोबर अनेक सेवाभावी संस्थांचे स्वयंसेवक यांना पोटभर जेवण मिळावे, यासाठी हे सहज सेवा ट्रस्ट तर्फे जेवण देण्यात येत आहे. फुड पॅकेटद्वारे हे जेवण या विभागातील सर्वांना पोचवण्याचे काम पोलीस दल आणि पश्चिम महराष्ट्र देवस्थान समिती करते. अन्नछत्राच्या ठिकाणी यात्रेकरुंना जेवणासाठी 108 बाय 138 म्हणजेच 15 हजार चौरस फुटाचा मोठा मंडप उभारण्यात आला आहे. त्याचबरोबर चहा आणि मठ्ठासाठी देखील वेगळा मंडप उभारण्यात आलेला आहे. स्वच्छतेची काळजी मोफत अझछत्र म्हणजे परिसरामध्ये सगळीकडे अस्वच्छता पसरते. मात्र गायमुख परिसरातील अन्नछत्र परिसरात निसर्गाचे रक्षण व्हावे, अन्नाची नासाडी होऊ नये, त्याचबरोबर येणाऱ्या यात्रेकरूंना व्यवस्थित जेवता यावे, याकरिता स्टेनलेस स्टीलची ताटे, चहा आणि मठ्ठयासाठी स्टीलचे ग्लास ठेवण्यात आले आहेत. हनुमान जयंतीला मंदिरात या मंत्राचा 108 वेळा करा जप; बजरंगबली राहील सदा पाठीशी हे जेवण तयार करण्यासाठी 20 मुख्य आचारी व त्यांचे मदतनीस, भाजी चिरण्यासाठी 30 महिला, 50 वाढपी, ताट वाटी भांडी धुण्यासाठी 70 महिला ताट वाटी स्वच्छ पुसून देण्यासाठी आणि इतर कामसाठी ५० मजूर, त्याच बरोबर सहज सेवा ट्रस्टचे विश्वस्त, स्नेही, हितचिंतक असे 400 स्वयंसेवक अहोरात्र काम करणार आहेत. दरम्यान, जोतिबाच्या या यात्रेसाठी जोतिबा डोंगरावर येणाऱ्या सर्व यात्रेकरुंनी या अन्नछत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहजसेवा ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क सहजसेवा ट्रस्ट : 9890944343