साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर, 20 फेब्रुवारी : ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’ च्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत वाडी रत्नागिरी म्हणजेच कोल्हापुरातील श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर खेट्यांना सुरूवात झाली आहे. पहिल्या खेट्याच्या निमित्तानं कोल्हापूरसह आसपासच्या परिसरातील तब्बल दीड ते दोन लाख भाविकांनी जोतिबाचं दर्शन घेतलं. या खेट्यांना एक वेगळचं महत्त्व आहे. श्री क्षेत्र जोतिबा डोंगर हे स्थान कोल्हापूरपासून जवळपास 15 ते 18 किमी अंतरावर आहे. या या ठिकाणी जोतिबा देवाचे मंदिर आहे. दख्खनचा राजा म्हटल्या जाणाऱ्या या देवस्थानाच्या ठिकाणी भगवान शंकराशी सबंधित मंदिरे आहेत. जोतिबा हे दैवत केदारनाथ किंवा केदारलिंग म्हणूनही ओळखले जाते. 18 व्या आणि 19 व्या शतकात मराठा सरदारांनी बांधलेली अनेक मंदिरं डोंगराच्या माथ्यावर आहेत. जोतिबाचे मूळ मंदिर 1730 मध्ये नवजी साया यांनी बांधल्याचं सांगितलं जातं. काय आहे परंपरा? माघ पौर्णिमा झाल्यानंतर प्रत्येक रविवारच्या दिवशी भाविकांची जी यात्रा भरते, त्याला जोतिबाचे खेटे असे म्हटले जाते. या खेंट्यांच्याबाबत एक आख्यायिका सांगितली जाते, पूर्वी केदारनाथ आपली दक्षिणेकडील मोहीम संपवून हिमालयातकडे परत निघाले. हे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीला कळताच ती कोल्हापूरहून अनवाणी पायाने पळत आली आणि केदारनाथला न जाण्याविषयी विनवणी केली. तेंव्हा केदारनाथाने जोतिबावर राहण्याचे मान्य केले. तेंव्हापासून कोल्हापूर ते जोतिबा डोंगराकडे पायी चालत खेटे घालण्याची प्रथा आजतागायत सुरु आहे. इथे चक्क शिवभक्त राक्षसाची करतात पूजा, पाहा शंभू महादेव मंदिराची मंदिर अभ्यासक ॲड. प्रसन्न मालेकर यांनी याबाबतची अधिक माहिती दिलीय. ‘माघ पौर्णिमा झाल्यानंतर या खेट्यांना सुरुवात होते. येणाऱ्या प्रत्येक रविवारी देवाचे दर्शन घेणे आणि पाचव्या रविवारी देवाला नैवेद्य दाखवणे अशी ही परंपरा आहे. जोतिबा अर्थात केदारनाथ हे उत्तरेहून दक्षिणेला आले होते. दक्षिणेतील दैत्यांचा संहार करुन आपले अवतारकार्य पूर्ण झाल्यानंतर ते हिमालयात जायला निघाले. करवीर निवासिनी अंबाबाई देवी त्यावेळी अनवाणीच धावत वाडी रत्नागिरी पर्यंत गेली आणि तिने जोतिबा देवांना करवीर क्षेत्रात थांबण्याची विनंती केली. तिच्या विनंतीमुळे देव जोतिबा या डोंगरावर विराजमान झाले. अशी ही अख्यायिका प्रचलित आहे. आपल्या देवीच्या कृतीचे अनुकरण करत आपल्या परिवाराचे आणि सर्वांचे सर्वतोपरी रक्षण देवाने करावे, या आर्त विनवणीसाठी भाविक हे खेटे घालत असतात, अशी माहिती ॲड. प्रसन्न मालेकर यांनी दिली आहे. गुरुचरित्रामध्येही उल्लेख असणारे तारकेश्वर मंदिर, पाहा काय आहे इतिहास, Video कसा असतो खेट्यांचा दिवस? वेगवेगळ्या देवतांच्या नावांच्या जयघोषात खेट्यांना सुरुवात होते. अगदी पहाटेपासूनच डोंगरावर येण्यास सुरुवात झालेली भाविकांची गर्दी संध्याकाळी प्रचंड वाढते. मंदिरात यावेळी सकाळी विविध विधी आणि स्तोत्रपठण करण्यात येते. दहा वाजण्याच्या सुमारास जोतिबा देवाची अलंकारिक महापूजा बांधण्यात येते. त्यानंतर 12 वाजण्याच्या सुमारास मंदिरात धुपारती होते. रात्री देवाचा पालखी सोहळा पार पडतो. यावेळी दिवसभर येणाऱ्या भाविकांकडून मंदिराच्या शिखरावर गुलाल-खोबऱ्याची उधळण सुरूच असते. खेट्याची सुरुवात डोंगराच्या पायथ्याशी होते. भल्या पहाटेच अंधारात भाविक अनवाणी पायांनी चालत डोंगर चढून दर्शनासाठी येत असतात. कुशिरे ते जोतिबा असा आडवाटेनेच खेट्यांचा पारंपारिक मार्ग आहे. कुशिरे गावात आपल्या गाड्या लावून आजही बरेचसे भाविक चालतच हा खेटा घालत असतात. या परंपरेत काळाप्रमाणे बदल झाले आहेत. काही भाविक आपल्या गाड्या डोंगरावर घेऊन येऊन देखील मंदिरात दर्शनाला येतात. महादेवाच्या पिंडीचे तोंड नेहमी उत्तरेला का असते? मंदिरातील काही नियम तुम्हाला माहितीच हवे! Video खेट्यांचे बदलते स्वरूप पूर्वी देवाच्या दर्शनाला पायी चालत जाऊन हे खेटे घातले जात असत. पण हळूहळू डोंगरावर गाडीने येणे, गडबडीने देवाचे दर्शन घेणे आणि परतणे अशी प्रथा सुरू झाली आहे. या पायी खेट्यांच्या निमित्ताने भक्ती आणि चालण्यामुळे मिळणारे आरोग्य असा दोन्हींचा संगम साधला जायचा. हे चित्र आता बदलल्यामुळे सध्या खेटे म्हणजे फक्त निमित्तमात्र बनले असल्याची प्रतिक्रिया देखील भाविक व्यक्त करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







