कोल्हापूर, 04 मार्च: पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार होण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दोघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात त्यांनी फरशी घातल्याने यात ते जखमी झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी पोलीस ठाण्यामध्ये (Shahuvadi Police, Kolhapur) हा प्रकार घडला. पोलीस स्टेशनमध्येच गोंधळ घालणाऱ्या दोघा तरुणांना कोर्टामध्ये सादर करत असताना त्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोक्यात फरशी घातली आणि ते फरार झाले. पोलिसांना पुन्हा या बदमाशांना पकडण्यात यश आलं आहे. मंगळवारी दुपारी शाहूवाडी पोलीस ठाण्यामध्ये मद्यधुंद अवस्थेत दोन तरुणांनी धिंगाणा घातला. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून या दोघांना बुधवारी कोर्टामध्ये दाखल केलं. मात्र त्याच वेळी एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोक्यामध्ये फरशी घालून हे दोघेजण फरार झाले. जखमी अवस्थेतही पोलिसाने थरारक पद्धतीने या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अलम अबीर शेख राहणार टेकोलीपैकी बांदारवाडी, ता. शाहूवाडी आणि बैथूल अब्दुल रहीमान शेख राहणार घाटकोपर, मुंबई अशी या दोन बदमाशांची नाव आहेत. या दोघांविरोधात 02 मार्च, मंगळवारी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनी शाहूवाडी पोलीस ठाण्यात मद्यधूंद अवस्थेत धिंगाणा करत तोडफोड केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयात घेऊन जात असताना त्यांनी पोलीस चिंतामणी कांबळे यांच्यावर हल्ला केला आणि तिथून पलायन केलं. (हे वाचा- Pooja Chavhan Death: भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल ) दोघांनाही अवघ्या काही तासात पकडण्यात पोलिसांना यश आलं. दरम्यान हा प्रकार घडला तेव्हा कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक मनोजकुमार लोहिया यांनी देखील पोलीस ठाण्यास भेट दिली होती. गावातील शेतात हे गुंड लपले असल्याने परिसरातील तरुणांनी देखील त्यांना पकडण्यास पोलिसांची मदत केल्याची माहिती मिळते आहे.