मुंबई, 16 मार्च : राज्यात मागच्या दोन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांसह हलक्या पावसाने हजेरी लावली. पावसाला पोषक हवामान असल्याने आजपासून (ता.१६) राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात गारपिटीसह वादळी पावसाचा तर विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘ऑरेंज’ अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
दरम्यान मागच्या 24 तासांता राज्यात विविध ठिकाणी वादळी वारे विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पावसाने धुमाकूळ घातला. दरम्यान हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
Ahmednagar News: छोट्या शेतकऱ्यांची कमाल, खडकाळ माळावर फुलवली शेती, पाहा Photosशाळू, द्राक्षे, कापणीला आलेला गहू, यासारख्या पिकांना मोठा दणका बसल्याच दिसून येत आहे. काल झालेल्या पावसाने कोल्हापूर, सांगली, सातारा, नागपूर, भुसावळ तालुक्यात मोठा पाऊस झाला आहे.
ढगाळ हवामान, पावसाळी वातावरणामुळे कमाल तापमानात घट होत आहे. कोकणातील उष्ण लाट निवळली आहे. मात्र राज्याच्या विविध भागात उकाडाही वाढला आहे. मागच्या 24 तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी 37.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात बहुतांशी ठिकाणी कमाल तापमान 33 ते 37 अंशांच्या दरम्यान होते.
यामुळे पोषक हवामान झाल्याने आज (ता. 16) राज्याच्या विविध भागात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात जिल्ह्यात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे, विजा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, नगर, पुणे आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गारपीट होण्याचा, विदर्भात वादळी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
भुसावळ तालुक्यासह यावल मुक्ताईनगर परिसरात मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा मका, गहू, केळी या पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच वातावरणात देखील गारवा निर्माण झाला असून अजूनही अवकाळी पावसाची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तवली आहे. याचबरोबर कोल्हापूर आणि नागपूर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.