एकनाथ शिंदेंची शिवसेना नेत्यांसह बैठक
मुंबई, 12 जून : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेनेच्या सर्व आमदार, खासदार, नेते आणि उपनेत्यांची बैठक बोलावली आहे. 19 जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, त्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोरेगावच्या नेस्कोमध्ये शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करणार आहेत. आज रात्री होणाऱ्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेगवेगळ्या विषयांवर आमदार खासदारांना मार्गदर्शन करणार आहे. वरळीमधल्या एनएससीआय सभागृहामध्ये रात्री 9 वाजता शिवसेनेच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. 19 जून 1966 साली शिवसेनेची स्थापना करण्यात आली. यानंतर पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन वर्धापन दिन साजरे केले जातील. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे एक तर ठाकरेंच्या शिवसेनेचा दुसरा असे वर्धापन दिनाचे दोन कार्यक्रम होतील. मागच्या वर्षी 20 जूनला म्हणजेच वर्धापन दिनाच्या एका दिवसानंतर शिवसेनेमध्ये न भूतो न भविष्यती अशी परिस्थिती निर्माण झाली. कल्याण लोकसभेची जागा कोणाच्या वाट्याला; बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे शिवसेनेच्या 40 आमदारांना घेऊन बाहेर पडले. यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि महाविकासआघाडी सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे यांनी फक्त मुख्यमंत्रीपदाचीच शपथ घेतली नाही तर शिवसेनेवरही दावा सांगितला. यानंतर शिवसेना कुणाची ही लढाई निवडणूक आयोगामध्ये झाली. अखेर निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिलं. यानंतर आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन साजरा करणार आहेत. याआधी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने दसरा मेळावाही केला होता.